म्हणून मोदींची गळाभेट घेतली ; राहुल गांधींचा जर्मनीत खुलासा

ऑनलाईन टीम / हॅम्बर्ग :
तिरस्काराला तिरस्कारानेच प्रत्युत्तर देणे म्हणजे मूर्खपणा आहे. भारतीय या शब्दाचा अर्थ अहिंसक असा होतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन मी तिरस्काराला प्रेमानं उत्तर दिलं, असं स्पष्ट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला.
नरेंद्र मोदी यांना मिठी मारण्याचा प्रकार काँग्रेस पक्षातीलही काही सदस्यांना रुचला – पटला नसल्याचे राहुल यांनी सांगितले. परंतु, मी त्यांच्याशी सहमत नाही. कारण अहिंसा हे भारताचं प्रतीक आहे आणि भारतीयत्वाचं सार आहे. पंतप्रधान मोदी माझ्याबद्दल द्वेष पसवणारी टीका करत आहेत. मी त्यांच्याबद्दल स्नेह दाखवला. हे जग द्वेषाने नाही, तर प्रेमाने चालते, हे सांगण्याचा प्रयत्न केला, असा टोला त्यांनी लगावला.
जर्मनीतील हॅम्बर्ग इथल्या बुसेरियस समर स्कूलमधील विद्यार्थ्यांशी राहुल गांधींनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. नोटाबंदी आणि जीएसटीद्वारे मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचं वाट्टोळे केले, असा हल्ला त्यांनी चढवला.