|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घरगुती वादातून युवकाची विहिरीत आत्महत्या

घरगुती वादातून युवकाची विहिरीत आत्महत्या 

कसवण – तळवडे येथील घटना

कणकवली:

घरगुती भांडणाचा राग अनावर झाल्याने कसवण-तळवडे (वरचीवाडी) येथील प्रशांत सत्यवान तिवरेकर (22) याने घराशेजारील विहिरीत उडी घेतली. यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9.45 वा. सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांतचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. तो मोलमजुरी करायचा. तो अतिशय रागीट, तापट स्वभावाचा होता. शुक्रवारी सकाळी तो शेतातून वैरण कापून घरी आला. यावेळी कोयत्याची धार गेल्याने प्रशांत व त्याचे वडील यांच्यात काहीसे भांडण झाले. भांडणाचा राग अनावर झालेला प्रशांत ‘आता जीवच देतो’ असे म्हणत विहिरीच्या दिशेने सुसाट धावत गेला व थेट विहिरीत उडी घेतली.

अचानक उद्भवलेल्या या प्रसंगानंतर तिवरेकर कुटुंबियांनी आरडाओरड केली असता परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले. सुमारे 30 फूट खोल असलेल्या विहिरीत पाणीही भरपूर होते. त्यामुळे ग्रामस्थांच्याही प्रयत्नांना मर्यादा आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत गळ सोडला. गळाला अडकलेल्या प्रशांतला बाहेर काढण्यात आले. पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती समजताच कणकवली पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक जयश्री पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात, कॉन्स्टेबल जीवन कुडाळकर, भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत प्रशांतचे वडील सत्यवान बाबू तिवरेकर (65) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

Related posts: