|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » बोपण्णा-शरण जोडीचे सुवर्णयश

बोपण्णा-शरण जोडीचे सुवर्णयश 

पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत कझाकस्तानवर मात, एकेरीत प्रज्नेशला कांस्य

वृत्तसंस्था/ जकार्ता

अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा व दिवीज शरण जोडीने आशियाई स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुष दुहेरीत भारताच्या या जोडीने कझाकस्तानच्या बुबलिक व येवसेव जोडीचा 6-3, 6-4 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तसेच, पुरुषांच्या एकेरीत प्रज्नेश गुणेश्वरनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यंदाच्या आशियाई स्पर्धेत टेनिसमध्ये मिळालेले भारताचे हे तिसरे पदक आहे.

सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात असलेल्या बोपण्णा व शरण जोडीने अंतिम फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करत सुवर्णस्वप्न साकार करुन दाखवले. कझाकस्तानच्या बुबलिक व येवसेव जोडीला संपूर्ण सामन्यात जराही डोके वर न काढण्याची संधी देता भारतीय जोडीने अवघ्या 52 मिनिटांत त्यांचा 6-3, 6-4 असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत भारतीय जोडीला प्रतिस्पर्धी जापनीज जोडीविरुद्ध खेळताना विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला होता. अंतिम फेरीत मात्र बोपण्णा व शरण जोडीने शानदार खेळ साकारला व जेतेपदाला गवसणी घातली. आशियाई स्पर्धेत दुहेरीत मिळवलेले यश निश्चितच आनंददायी असल्याची प्रतिक्रिया बोपण्णाने सामन्यानंतर दिली.

आतापर्यंतच्या, आशियाई स्पर्धेतील पुरुष दुहेरीमधील भारताचे चौथे सुवर्णपदक ठरले. याआधी, 2010 ग्वांग्झु येथील स्पर्धेत सोमदेव देववर्मन व सनम सिंग यांनी सुवर्ण जिंकले होते. तसेच 2002 व 2006 मधील स्पर्धेत लियांडर पेस व महेश भुपती जोडीने सलग दोनवेळा सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली होती. 2014 मध्ये मात्र साकेत मानेनी व सनम सिंग जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. 

पुरुष एकेरीत प्रज्नेश गुणेश्वरनला कांस्य

टेनिसमध्ये पुरुषांच्या एकेरीतील उपांत्य सामन्यात भारताच्या प्रज्नेशला उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोबिनकडून 6-2, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. यामुळे प्रज्नेशला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Related posts: