|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शहीद कुंडलिक यांच्या मुलांनाही सैन्य दलातच पाठविणार

शहीद कुंडलिक यांच्या मुलांनाही सैन्य दलातच पाठविणार 

प्रतिनिधी / कोल्हापूर

माझा मुलगा कुंडलिक हा देशरक्षणासाठी शहीद झाला. त्याची आठवण काढत आता रडायचे नाही तर लढत रहायचा मी ठरवलंय. कुंडलिकचा मुलगा आणि मुलगीलाही सैन्यदलात भरती करण्याचंही मी ठरवलं आहे. कुंडलिकाबरोबरच भारतीय जवानांनी सीमेवर सांडलेल्या रक्ताचा हिशोब चुकता करण्याचे काम कुंडलिकची मुलं नक्कीच करतील, असा आशावाद शहीद जवान कुंडलिक यांच्या आई ज्ञानुबाई माने (रा. पिंपळगाव, ता. कागल) यांनी सांगताच अभिमानाने उर भरून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत ज्ञानुबाई यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी साद घातली. निमित्त होतं स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्याच्या कार्यक्रमाचं. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला.

   रविवारी (दि. 26) रक्षाबंधन हा सण आहे. याचे औचित्य साधून देश संरक्षणार्थ प्राणाची बाजी लावून लढणाऱया जवानांकडे पाठविण्यासाठी विवेकानंद ट्रस्टने जमविलेल्या 2 लाख राख्या मराठा बटालियन (टी. ए.) लेफ्टनंट तानाजी चौगुले यांच्याकडे सुपूर्त केल्या. महापौर शोभा बोंद्रे, सिंधुदूर्गचे शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या बहीण अश्विनी तावडे यांच्या हस्ते चौगुले यांनी राख्या स्वीकारल्या. यावेळी मराठा बटालियनच्या जवानांना विविध शाळांमधील मुलींनी राख्या बांधून त्यांच्याशी भावाचे नाते जोडले.

   कार्यक्रमांच्या प्रारंभी शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष किशोक घाटगे यांनी सीमेवर राख्या पाठविण्यामागची भूमिका सांगितली. गेल्या 19 वर्षाच्या कालावधीत एक राखी सीमेवरील जवानासाठी हे ब्रीद घेऊन लोकसहभागातून जमविलेल्या तब्बल 12 ते 13 लाख राख्या जवानांकडे पाठविल्याचे घाटगे यांनी सांगितले. लेफ्टनंट चौगुले यांनी देशभरातील बहिणींकडून पाठविल्या जाणाऱया राख्या जवानांना शत्रूविरुद्ध लढण्यासाठी मोठे बळ देतात, असे सांगितले. महापौर बोंद्रे, सेवानिवृत्त सुभेदार एन. एन. पाटील (सांगवडेकर), आदर्श करीअर ऍपॅडमीचे संचालक अंकुश टोपले यांचेही भाषण झाले. यावेळी कुंडलिक यांचे वडील केरबा माने, नगरसेवक प्रतिज्ञा निल्ले, माजी नगरसेवक माधुरी नकाते, सीमा जोशी, कमलाकर किलकिले, डॉ. आनंद गुरव, श्रीनिवास माने, डॉ. सायली कचरे, धनंजय नामजोशी, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते. राजेद्र मकोटे व स्वप्निल पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. 

अन् अश्रूंचा बांध फुटला…

शहीद कौस्तुभ रावराणे यांच्या बहिण अश्विनी तावडे यांनी कौस्तुभ यांच्या आठवणींसह कोल्हापुरात आणलेल्या अस्थीकलशावेळी पहायला मिळालेल्या लांच्छणास्पद दृश्याची माहिती सांगितली. त्या म्हणाल्या, कोल्हापुरात कौस्तुभ यांचा अस्थीकलश ट्रकातून वाहून नेला जात असताना एका उनाड तरुणाने तोंडातील सीगारेट चक्क ट्रकमध्ये फेकली. त्याने वाहनही वेगाने चालवून बेजबाबदारपणा दाखवून दिला. सीगारेट फेकताना ट्रकामध्ये काय आहे नाही याचा थोडाही विचार केला नाही, असे सांगताच उपस्थित जवानांना अश्रू अनावर झाले. कौस्तुभ यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही लहानपणी घरी खेळत असताना कौस्तुभ हा सैनिक बनायचा आणि आम्ही भावंड शत्रू बनायचो. तो हातात बंदूक घेऊन आम्हाला मारायचा. साहजिकच त्यांच्या मनात सैनिक बनण्याचे पक्के झाले. तो जसा मोठा होऊ लागला, तसा तो सैनिकच होणार असे सांगू लागला. पाहता-पाहता तो सैन्यदलात रुजू झाला. पुढे मेजर झाली आणि मेजर म्हणून सीमेवर कर्तव्य बजावताना अचानक शहीदही झाला, असा सांगताना तावडे यांच्या अश्रूंच्या बांध फुटला. त्यांच्यासोबत सारे शाहू स्मारक भवनच गहिवरुन गेले.