|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली घाटात शिवशाही बसला अपघात

आंबोली घाटात शिवशाही बसला अपघात 

प्रवासी बचावले, चालक किरकोळ जखमी

सावंतवाडी:

आंबोली घाटातील कुंभेश्वर येथील वळणाचा अंदाज न आल्याने पुणे येथून सावंतवाडी येथे येणारी शिवशाही बस गटारात उतरून झाडाला आदळल्याने अपघात झाला. अपघातातून बसमधील सात प्रवासी सुखरुप बचावले. हा अपघात रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. बसमधील प्रवाशांना पर्यायी बसने सावंतवाडीत पाठविण्यात आले. अपघाताची तक्रार बसचालक राहुल मोहिते (वडगाव-हातकणंगले) यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात दिली.

शिवशाही बसचालक राहुल मोहिते हे पुणे-सावंतवाडी या बसमधून प्रवाशांना घेऊन आंबोलीमार्गे सावंतवाडी येथे येत होते. रविवारी पहाटे बस आंबोली घाटातील कुंभेश्वर उताराच्या वळणावर आली असता बसचालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस चालकाच्या बाजूने गटारात उतरून झाडाला ठोकरली. बस अडकून राहिल्याने गंभीर अपघात टळला. सुदैवाने बसमधील प्रवासी बचावले. मात्र, चालक किरकोळ जखमी झाला. अपघातस्थळी आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत, हवालदार प्रकाश कदम यांनी पंचनामा केला. दरम्यान, शिवशाही बसला वारंवार होणाऱया अपघातांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Related posts: