|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » रक्षाबंधनानिमित्त बहिणींना स्वच्छतागृहांची भेट

रक्षाबंधनानिमित्त बहिणींना स्वच्छतागृहांची भेट 

जिल्हा पंचायतीच्यावतीने अनोखा उपक्रम, जिल्हय़ात 300 हून अधिक वैयक्तिक स्वच्छतागृहांची भेट

बेळगाव / प्रतिनिधी

रविवारी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. यावेळी भावाकडून बहिणीस रोख रक्कम आणि विविध भेटवस्तूंचे आदानप्रदान झाले. मात्र जिल्हय़ात हा सण वैशिष्टय़पूर्णरीत्या साजरा करण्यात आला. जिल्हय़ातील अनेक गावात रक्षाबंधनानिमित्त भावाने आपल्या बहिणींना अनोखी भेट दिली आहे. स्वत: पुढे होऊन बांधून घेतलेल्या स्वच्छतागृहांची भेट देऊन बहिणींच्या लज्जा रक्षणाचे काम केले आहे. जि. पं. चे सीईओ रामचंद्रन आर. यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला.

येत्या 2 आक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हय़ात वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधून घेण्यासाठी जि. पं. वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून जिल्हय़ातील अनेक गावात बांधून पूर्ण झालेल्या सुमारे 300 हून अधिक स्वच्छतागृहांची भेट भावांनी आपल्या बहिणींना दिली आहे. बहिणींसह घरातील महिलावर्गाच्या लज्जा रक्षणासाठी रक्षाबंधनानिमित्त ही अनोखी भेट देताना स्वच्छतागृहांची चावी बहिणीकडे सुपुर्द केली.

जि. पं. चे सीईओ रामचंद्रन आर. यांनी बेळगाव जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न सुरू केले आहेत. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये रक्षाबंधनानिमित्त भावाने आपल्या बहिणीस स्वच्छतागृहाची भेट दिली होती. हाच उपक्रम रामचंद्रन आर. यांनी मोठय़ा प्रमाणात राबविण्याचा निर्णय घेतला.  रक्षाबंधनादिनी जिल्हय़ातील विविध तालुक्मयात सुमारे 300 हून अधिक वैयक्तिक स्वच्छतागृहे भावांनी आपल्या बहिणींसाठी भेट स्वरुपात दिली. जिल्हय़ातील इतिहासात हे क्रांतिकारक पाऊल मानले जात आहे.  

Related posts: