|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चांद्रयान-2 मोहीम जानेवारीत

चांद्रयान-2 मोहीम जानेवारीत 

इस्रोने केली घोषणा : प्रक्षेपक बदलला जाणार, मार्च 2019 पर्यंत 19 अंतराळमोहिमा

वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा

भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या तारखेची अखेर घोषणा झाली आहे. चांद्रयान-2 मोहीम जानेवारी महिन्यात पार पडणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. मार्च 2019 पूर्वी 19 अंतराळमोहिमा पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.

चांद्रयान-2 मोहिमेच्या प्रक्षेपणासह भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरेल. तांत्रिक कारणामुळे मोहिमेला विलंब झाल्याचे स्पष्टीकरण अंतराळ संस्थेकडून देण्यात आले होते, परंतु इस्रोच्या घोषणेने आता भारताचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

जानेवारी 2019मध्ये जीएसएलव्ही-एमके-3-एम1 माध्यमातून चांद्रयान-2 चे प्रक्षेपण केले जाईल. अनेक तज्ञांनी आमच्या प्रयत्नांचे कौतुक करत केले आहे. चांद्रयान-2 चे वजन वाढून 3.8 टन झाले असल्याने ते जीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपित केले जाऊ शकत नाही. जीएसएलव्हीमध्ये बदल करून नव्या आवृत्तीसह याच्या प्रक्षेपणाची योजना आखली आहे. चंद्राच्या दक्षिण धूवानजीक जाणारे हे पहिले यान असेल असे गौरवोद्गार इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी काढले आहेत.

आशियाई देशांमध्ये चढाओढ

आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्रावर अगोदरच आपली हजेरी नोंदविली आहे. चंद्रावर पोहोचण्याच्या शर्यतीत भारत आणि इस्रायल हे दोन आशियाई देश सामील असल्याने चुरस वाढली आहे.

दक्षिण धुवावर उतरणार यान

इस्रो स्वतःचे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेने पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला होता. चांद्रयान-2 या मोहिमेचा पुढील टप्पा आहे.

दुसरी मोहीम, भारताची योजना

चांद्रयान-2 ही भारताची चंद्राकरता दुसरी मोहीम आहे. चांद्रयान-2 च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाशी संबंधित माहिती भारत प्राप्त करणार आहे. या चंद्रमोहेमेसाठी भारत स्वतःचा सर्वात अवजड अग्निबाण बाहुबलीचा वापर करणार आहे.

चांद्रयान-2 चे कार्यस्वरुप

चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचल्यावर चांद्रयान-2 लँडर ऑर्बिटरपासून विभक्त होईल आणि चंद्राच्या दक्षिण धूवानजीक उतरेल. लँडरमधील 6 चाकांच रोव्हर वेगळा होईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सरकू लागेल. चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस राहू शकेल आणि 150-200 किलोमीटरचे अंतर गाठू शकेल अशापद्धतीने रोव्हरची रचना करण्यात आली आहे. रोव्हर लँडिंगच्या 15 मिनिटातच छायाचित्रे पाठविणार आहे.