|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 1 लाख घरांच्या स्वच्छतेसाठी 70 हजार स्वयंसेवक

1 लाख घरांच्या स्वच्छतेसाठी 70 हजार स्वयंसेवक 

केरळ पूर संकट : कुट्टनाद क्षेत्रात स्वच्छता मोहिमेस प्रारंभ, राज्याच्या अर्थमंत्र्यांचा देखील सहभाग

  वृत्तसंस्था/ कुट्टनाद

पूर ओसरल्यानंतर केरळमध्ये आता स्वच्छता मोहिमेने जोर पकडला आहे. भातशेतीचे क्षेत्र म्हणून ओळख असणाऱया कुट्टनादमध्ये पुरासोबत वाहून आलेला गाळ आणि ढिगारा हटविण्यासाठी सुमारे 70 हजार स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आहे.

केरळमध्ये पुनर्वसनाचे काम सुरू असून समुद्रसपाटापेक्षा कमी उंचीवर असणाऱया कुट्टनाद क्षेत्रात अनेक भाग अद्याप पाण्याखाली बुडालेले आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी आता बहुतांश हिस्स्यांमध्ये ओसरू लागले आहे. राज्याचे अर्थमंत्री थॉमस इसाक आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री जी. सुधाकरन यांनी मोहीम सुरू केली असून यात सुमारे 70 हजार स्वयंसेवक कुट्टनाद आणि अलापुझा जिल्हय़ातील नेदुमुदी, कैनाकरी आणि अन्य भागांमधील सुमारे 1 लाख इमारतींची स्वच्छता करणार आहेत.

किमान 1 हजार अभियंते तसेच सर्पमित्र देखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत. नौका आणि बसमधून प्रवास करत स्वयंसेवक कुट्टनादमध्ये पोहोचले आहेत. घरे, सार्वजनिक ठिकाणे तसेच धार्मिक स्थळांसमवेत 1 लाख इमारतींच्या स्वच्छतेसाठी 16 तालुक्यांमध्ये ते पोहोचले असल्याची माहिती सुधाकरन यांनी दिली.

घरी परतू लागले लोक

मोठय़ा संख्येत घरे अद्याप पाण्यात बुडालेली असल्याने साफसफाईसाठी आणखीन वेळ लागू शकतो. मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहून मी भारावून गेलोय. अनेक ठिकाणांवर लोक स्वतःच्या घरी परतू लागल्याचे इसाक यांनी सांगितले. ओणमच्या सुटीनंतर शाळा बुधवारपासून सुरू होणार असल्याने शालेय परिसराच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. मदतशिबिर ठरलेल्या शाळांमध्ये राहत असलेल्या लोकांना सभागृह तसेच समुदायभवनांमध्ये हलविले जाईल.

 कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुरानंतर 14 ऑगस्ट रोजी विमानसेवा थांबविली होती, ही सेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू होऊ शकते.