|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाकला हवेत 9 अब्ज डॉलर्स

पाकला हवेत 9 अब्ज डॉलर्स 

आर्थिक कंगालपणातून मुक्त होण्यासाठी मोठय़ा रकमेची आवश्यकता

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

पाकिस्तान आर्थिकदृष्टय़ा डबघाईला येत असून त्याला त्याची व्यापारी तूट भरून काढण्यासाठी किमान 9 अब्ज डॉलर्स अर्थात 63 हजार कोटी भारतीय रूपयांची तत्काळ आवश्यकता आहे, असे विधान त्या देशाचे नवे अर्थमंत्री असाद उमर यांनी यांनी केले आहे.

पाकिस्तानवर सध्या कर्जाचा डोंगर उभा आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये देशावर 28 लाख कोटी रूपयांचे कर्ज झाले असून त्याचे हप्तेही चुकविणे कठीण झाले आहे. त्या देशाची वास्तविक तात्कालीक आवश्यकता 12 अब्ज डॉलर्सची असून त्यातील किमान 9 अब्ज डॉलर्स त्वरित हवे आहेत, असे उमर यांनी स्पष्ट केले आहे.

नवे सरकार पाकला आर्थिक दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून त्यांचे परिणाम दिसून येण्यास किमात दोन ते तीन वर्षे लागतील. तोपर्यंत व्यापारी तूट भरून काढण्यासाठी 9 अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. तथापि, अद्याप आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे उसनवारी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.

येत्या सोमवारी नवे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यात अनेक उपायांवर विचार केला जाण्याची शक्यता आहे. तसेच देशाला वाचविण्यासाठी काय करता येईल याची योजना येत्या दोन ते तीन आठवडय़ांमध्ये तयार करण्यात येणार आहे.

Related posts: