|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जपानमध्ये ‘जेबी’चा धुमाकूळ

जपानमध्ये ‘जेबी’चा धुमाकूळ 

शक्तिशाली चक्रीवादळाचा तडाखा : रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक ठप्प, 11 जणांचा झाला मृत्यू

वृत्तसंस्था/ ओसाका

जपानच्या तोकुशिमामध्ये शक्तिशाली चक्रीवादळ ‘जेबी’ने मोठे नुकसान घडविले आहे. चक्रीवादळामुळे आतापर्यंत 11 जणांना जीव गमवावा लागला तर 90 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. याचदरम्यान जपान सरकारने 10 लाख लोकांना सुरक्षितठिकाणी हलविण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी धडकलेल्या या वादळाने नौका, कार्स समवेत अन्य वाहनांचे मोठे नुकसान घडविले आहे.

जपानच्या 25 वर्षांच्या इतिहासात ‘जेबी’ सर्वाधिक शक्तिशाली वादळ ठरले आहे. या भीषण चक्रीवादळामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. देशांतर्गत विमान कंपन्यांनी 600 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. तर रेल्वे वाहतुकीवर देखील प्रभाव पडला आहे. या चक्रीवादळाने बुधवारी आणखीन उग्र रुप धारण केले.

जेबी चक्रीवादळ सर्वात अगोदर शिकोकू बेटावर धडकले, जेथे 208 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहिले. वादळामुळे क्योटो शहरात मुसळधार पाऊस पडला. वेगवान वाऱयांमुळे अनेक शहरांमधील वीजसेवा ठप्प झाली असून शेकडो वाहने रस्त्यांवर उलटली आहेत. कन्साय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचल्याने विमानतळ बंद करावे लागले. यामुळे सुमारे 3 हजार पर्यटक तेथे अडकून पडले आहेत.

24 तासांत 500 मिलिमीटर पाऊस

हवामान विभागाने बुधवार-गुरुवारी मध्य जपानमध्ये 500 मिलिमीटर तर पश्चिम जपानमध्ये 400 मिलिमीटर पाऊस पडणार असल्याचा अनुमान व्यक्त केला. 1993 नंतर धडकलेले हे सर्वात भीषण चक्रीवादळ असल्याने खबरदारी घेण्याची गरज असल्याचे विभागाने
म्हटले.

बुलेट ट्रेन बंद, उड्डाणे स्थगित

टोकाइडो शिंकनसेन आणि सान्यो शिंकसेन बुलेटट्रेन मार्ग बंद करण्यात आले आहेत. प्रमुख महामार्गाचे काही भाग देखील बंद ठेवण्यात आले. जपानच्या दोन मोठय़ा विमानवाहतूक कंपन्या ऑल निप्पन एअरवेज आणि जपान एअरलाइन्सने अनुक्रमे 289 आणि 180 उड्डाणे रद्द केली आहेत.

Related posts: