|Thursday, February 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कृषी पर्यटनाला शासन दरबारी अधिकृत दर्जाच नाही!

कृषी पर्यटनाला शासन दरबारी अधिकृत दर्जाच नाही! 

हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांची खंत

अनास्था पाहून मन आंदोलनाच्या पवित्र्यात

धारिया म्हणाले….

‘चॅम्पियन सेक्टर’साठी एकही प्रस्ताव नाही

कोकणात मगर संवर्धनासाठी प्रयत्न सुरू

एमटीडीसीच्या बारा रिसॉर्टच्या लवकरच निविदा

संदीप घाग /सावर्डे

राज्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोकणात असताना शासन दरबारी कृषी पर्यटनाला अधिकृत दर्जाच नाही. योग्य मार्गदर्शन आणि लिखित मसुदाच नसल्याने ‘रिसॉर्ट’लाही कृषी पर्यटन म्हटले जात असल्याची खंत हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांनी व्यक्त केली. पर्यटनाबाबतची ही अनास्था पाहून मन आंदोलन करण्यासाठी तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात, कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण कृषी पर्यटन परिषदेत ते बोलत होते. कृषी पर्यटन तरुणांना खुणावत असले तरी कृषी पर्यटनाबाबत नेमका मसुदा नाही. या पर्यटनाला परवानगी कोणी द्यावी हे निश्चित नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला विकासात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन मसुद्यासाठी पुढाकार आवश्यक

पर्यटन मसुदा 6 महिन्यात जाहीर न झाल्यास या क्षेत्रातील सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. केवळ हॉटेल व्यवसाय म्हणजे पर्यटन नव्हे पनवेलपासून मुंबई-गोवा महामार्गाचा विचार केल्यास येथील अनेक मोठमोठी हॉटेल्स बंद पडली. हा व्यवसाय विकसित करताना पर्यटनाची जोड देऊन या व्यवसायात येणाऱया अडचणी जाणून घेऊन वेबसाईटवर, सोशल मीडियावर लाईक मिळवण्यापेक्षा आधुनिक बदल करून पर्यटन केंद्र विकसित करून या उद्योगात पाय रोवले पाहिजेत.

कोकणला देवाचा प्रदेश मानले जाते. येथील तरूणांनी नोकरीसाठी अन्यत्र जाण्यापेक्षा पर्यटनविषयक व्यावसायिक मार्गदर्शन मिळाले तर तो येथेच रोजगार मिळवू शकतो. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा वापर करून व्यवसाय विकसित करून दिला, निसर्ग संपत्तीचा खऱयाअर्थाने कृषी पर्यटनासाठी उपयोग करता येईल. कोकणला लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा, निसर्गाच्या कुशीत मोठमोठय़ा नद्या, धबधबे पर्यटकांना आकर्षीत करतात. ज्या-ज्या गावात अशी पर्यटन ठिकाणे आहेत, त्या-त्या गावात बंद असलेली घरे कृषी पर्यटकासाठी ‘होम स्टे’ बनली, तर कमी भांडवलामध्ये कृषी पर्यटन केंद्र उभारली जाऊन येथील उद्योजक भरारी घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

चॅम्पियन सेक्टरला 5 हजार कोटी

जागतिक पर्यटक कोकणात आकर्षित व्हावेत यासाठी मगर संवर्धन केंद्र विकसित करण्यासाठी कृषी पर्यटनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यामध्ये महत्वाची भूमिका घेतली आहे. शासनाने कृषी पर्यटन उद्योगास चालना देण्यासाठी चॅम्पियन सेक्टर योजना आणली आहे. यासाठी 5 हजार कोटी निधी मंजूर झाला आहे. यात खासगी संस्थांना अर्थसहाय्य मिळू शकते, मात्र कोकणातून एकही प्रस्ताव सादर झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कृषी पर्यटन व्यावसायिक एमटीडीसाला नोंदणीकृत नाहीत. एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटन उद्योगासाठी तयार असलेली 12 रिसॉर्टस्ची निविदा लवकरच जाहीर होणार असल्याने त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले.

जागतिकस्तरावर पर्यटन व्यवसायाचे महत्व सांगताना अनेक पैलूंची माहिती धारिया यांनी दिली. तसेच विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्यांना कृषी पर्यटन प्रशिक्षण मिळावी यासाठी शेखर निकम यांनी पुढाकार घेऊन कृषी शिक्षण अभ्यासक्रमात कृषी पर्यटनविषयक 3 महिन्याचे प्रशिक्षण सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

Related posts: