|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आपटी पुलाचे काम तातडीने मार्गी लावा

आपटी पुलाचे काम तातडीने मार्गी लावा 

प्रतिनिधी /सातारा :

वागदरे ते गाळदेव या रस्त्याचे 4 किलोमीटरचे काम पुर्ण झाले आहे मात्र, पुढील 3 किलोमीटर लांबी ही वनविभागाच्या हद्दीत असल्याने मंजुरीसाठी केंद्र शासनाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्याचे काम चालू करा. तसेच आपटी ते तापोळा जोडणाऱया मोठय़ा पुलाचे काम मार्गी लावा आणि सातारा शहरातील भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक, जिल्हा परिषद चौकासह सातारा व जावली तालुक्यातील रहदारीच्या सर्व रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सवापुर्वी मुजवा, अशा सक्त सूचना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना केल्या. 

आमदार शिवेंद्रराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज यांची भेट घेवून जावलीतील वागदरे-गाळदेव रस्ता, आपटी ते तापोळा नवीन पूल आणि सातारा व जावली तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांवरील खड्डे यासंदर्भात चर्चा केली. यावेळी उपअभियंता के.जी. निकम, सातारा व जावली तालुक्यातील सर्व अभियंते, संतोष आखाडे, भागोजी पाटील, दत्तात्रय आखाडे, भोगोली मुराचे सरपंच जयवंत आखाडे, तुकाराम आखाडे, शंकर जंगम, गाळदेवचे उपसरपंच राजाराम जंगम, झुमु हिरवे, बबन जंगम आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

अधिकाऱयांनी दिले आश्वासन

गणेशोत्सवास 13 तारखेपासून सुरुवात होत आहे. खड्डयांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सातारा शहरातील बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱया सर्व रस्त्यांवरील खड्डे मुजवावेत. तसेच जावली तालुक्यातही खड्डे मुजवण्यासाठी बांधकाम विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी सक्त सूचना आमदार शिवेंद्रराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना केली. सर्वच प्रश्नांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन राजभोज व त्यांच्या सहकारी अधिकाऱयांनी यावेळी दिले.

Related posts: