|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नीतेशची सायकलने थेट हिमालयाला गवसणी

नीतेशची सायकलने थेट हिमालयाला गवसणी 

    प्रतिनिधी / सिंधुदुर्ग

 इच्छाशक्ती प्रबळ ठेवून त्याला जिद्ध व मेहनतीची जोड दिली, तर हिमालयाला देखील गवसणी घालता येते. सिंधुदुर्गच्या नीतेश परुळेकर या युवकाने अशाच प्रकारच्या इच्छाशक्तीच्या बळावर थेट हिमालयालाच आव्हान देत थेट सायकलवरून मनाली ते लेह ही अतिशय खडतर अशी सायकल परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली.  या दरम्यान त्याने ‘तांगलांगला पास’ ही जगातील दुसऱया क्रमांकाची उंच खिंड देखील पालथी घातली. त्याने एकटय़ाने जाऊन हा पराक्रम केला, हे विशेष.

 अनेक साहसी सायकलवीर विविध ठिकाणी अशा अवघड परिक्रमा करत असतात. मात्र कोणाचीही, कसलीही मदत वा सोबत न घेता एकटय़ाने अशा अवघड परिक्रमा पूर्ण करणारे साहसवीर केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच असतात. नीतेश अशा साहसवीरांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या गावात राहाणारा नीतेश हा खरं तर ग्राफिक्स डिझायनर. वेंगुर्ले-पाटकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रमेश परुळेकर यांचा तो मुलगा. तर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल यांचा तो भाऊ. परुळेकर कुटुंब हे साहसाची आवड असलेले कुटुंब. या कुटुंबातील नीतेशला लहानपणापासून सायकलचे वेड. शाळेत असताना तो सायकलने मालवण, सावंतवाडी, कुडाळ असा पल्ला गाठायचा. पुढे त्याला शिक्षणासाठी जिल्हा सोडावा लागला. ग्राफिक्स डिझायनर म्हणून आपले करिअर सुरु केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपल्या आवडत्या सायकलिंगकडे वळायचा निर्धार केला आणि तो तडीसही नेला.

 नीतेशला फोटोग्राफीची देखील आवड आहे. तो एक उत्तम छायाचित्रकार आहे. छायाचित्रणाचीही हौस फिटवण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक मनाली ते लेह हा अतिशय खडतर, परंतु तेवढाच निसर्गसंपन्न मार्ग निवडला. समुद्रसपाटीपासून 2000 मीटरपासून ते 5328 मीटर उंचावर असलेले अतिशय दुर्गम व धोकादायक रस्ते, अंग गोठवणारी थंडी, ऑक्सीजनची कमतरता, मैलोनमैल निर्मनुष्य रस्त्यांमुळे खाण्याचा, पाण्याचा अभाव, निवाऱयाची गैरसोय या सर्व अडचणी आव्हान म्हणून स्वीकारत त्याने 11 दिवसांत ही मोहिम फत्ते केली. या मोहिमेदरम्यान आई व मावस बहिणीने बनवून दिलेल्या पौष्टिक लाडवांनी त्याने भूक भागवली. वाटेत अभावानेच मिळणारे तंबू हिच त्याची निवाऱयाची व्यवस्था होती.

16 ऑगस्ट रोजी नीतेशने मनाली येथून आपल्या सायकल परिक्रमेस प्रारंभ केला व 26 ऑगस्ट रोजी तो लेह येथे पोहचला. या प्रवासादरम्यान रोहतांगपास (3980 मीटर), बारालय (5030 मीटर), लांगुग (5079 मीटर), तांगलांग पास (5328 मीटर), लेह (3500 मीटर) या अतिउंचावरील खिंडी पार कराव्या लागल्या. वातावरण पाहून अंतर किती कापायचं, याचा निर्णय तो घेत असे. सकाळी 6.30 वाजता सुरू झालेला प्रवास कधीतरी दुपारी दीड वाजेपर्यंत संपे, तर कधीतरी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू राही. या प्रवासादरम्यान अतिउंचावर हवा विरळ असल्यामुळे प्रचंड दमछाक होई. पण जिद्धीच्या जोरावर या सर्व अडथळय़ांवर मात करीत नितेशने ही परिक्रमा पूर्ण करण्यात यश मिळविले. या परिक्रमेसाठी नीतेशने पॉलीगॉन कंपनीची माऊंटन सायकल वापरली. या परिक्रमेत यश मिळविण्यासाठी त्याने तिलारी व आंबोली घाटात कसून सराव केला होता. या यशानंतर या पेक्षाही मोठे लक्ष्य नजरेसमोर ठेवून नीतेश नुकताच सिंधुदुर्गात पोहोचला.