|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘नेफर्टिटी’ जहाज केरळ सरकारकडे सुपूर्द

‘नेफर्टिटी’ जहाज केरळ सरकारकडे सुपूर्द 

प्रतिनिधी/ मडगाव

रासई-लोटली येथील विजय मरिन शिपयार्ड मध्ये सुमारे साडे सोळा कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आलेले ‘नेफर्टिटी’ हे प्रवासी जहाज काल केरळ सरकारडे सुपूर्द करण्यात आले. ‘इजिप्तियन थिम़’वर बांधण्यात आलेले हे भारतातील पहिलेच जहाज आहे. केरळ सरकारचे मुख्य सचिव टॉम जुझे व केरळ सरकारच्या केएसआयएनसीचे व्यवस्थापकीय संचालक मुहम्मद हनिष यांनी नेफर्टिटीचे काल रविवारी उद्घाटन केले.

गेल्या दिड वर्षापूर्वी या जहाजाच्या निर्मितीला प्रारंभ झाला होता. हे जहाज बांधून जुलै महिन्यात जवळपास पूर्ण झाले होते. मात्र, केरळ राज्यात आलेल्या महापूरामुळे त्यांचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. या जहाजावर सुमारे साडेसोळा कोटी रूपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती विजय मरिन शिपयार्ड तर्फे देण्यात आली. ‘इजिप्तियन थिम’वर जहाजाची निर्मिती करण्याची निविदा केरळ सरकारने जारी केली होती. ती गोव्याच्या विजय मरिन शिपयार्डने प्राप्त केली होती व विजय मरिन तर्फे बांधण्यात आलेले पहिलेच प्रवासी जहाज आहे.

या जहाजावर दोनशे प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. हे जहाज कोणत्याही समुद्रात वापरणे शक्य आहे. मात्र, केरळ सरकारने अशा जहाजाची निर्मिती खास करून पर्यटकांना खोल समुद्राचे नयनरम्य दर्शन घडविण्यासाठी केली आहे. या जहाजाचा समावेश ‘स्टार प्रुझ’मध्ये होणार असल्याने केरळमधील बॅक वॉटरसाठी त्याचा वापर केला जाणार नाही. 20 नॉटिकल माइल पर्यंत ते समुद्रात जाणार आहे. अशा जहाजातून प्रवास करण्यासाठी अगोदर प्रवाशांना जहाजावरील स्वतंत्र खोली आरक्षीत करावी लागते. मात्र, या जहाजात तशी व्यवस्था नाही. आपण आपल्या फॅमिली सह प्रवासाला जाऊ शकतात.

दिवसभरात खोल समुद्राचे दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी जहाज पुन्हा धक्यावर  येईल. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी जहाजावर खास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच इतर प्रवाशांच्यासाठी थ्रीडी चित्रपटाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर बार आणि रेस्टॉरंन्टची व्यवस्था देखील उपलब्ध आहे. जहाज तीन मजली असून अंतर्गत सजावट अतिशय सुरेखरित्या करण्यात आलेली आहे.

अशा पद्धतीच्या जहाजाची निर्मिती पहिल्यादाच होत असून भविष्यात अनेक जण गुंतवणूक करीत असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

देशात पहिल्यादाच अशा जहाजाची बांधणी

नेफर्टिटी जहाज म्हणजे पर्यटकांसाठी खास अनुभव ठरणार असून देशात अशा प्रकारच्या जहाजाची बांधणी प्रथमच करण्यात आली. हे जहाज केरळ सरकारच्या ताफ्यात दाखल होत असल्याने आपल्याला आनंद होत असल्याचे केरळ मुख्यसचिव टॉम जुझे म्हणाले.

जहाजाची बांधणी उच्च दर्जाची झाली असून केरळमध्ये येणाऱया पर्यटकांना या जहाजातून प्रवास करणे म्हणजे खास अनुभव असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुहम्मद हनिष व राज्य सरकारच्या शिक्षण सचिव नीला मोहनन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गोवा सरकारने असा उपक्रम सुरू करावा अशी इच्छा यावेळी नीला मोहनन यांनी व्यक्त केली.

Related posts: