|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बाप्पा सुबुद्धी दे !!

बाप्पा सुबुद्धी दे !! 

आजकाल श्रद्धेचाच सर्वत्र बाजार झाला असून सणाच्या नावाखाली जेवढे भक्तीचे प्रदर्शन मांडण्यात येईल त्यालाच आपण अधिकाधिक प्राधान्य देत आहोत, किंबहुना समाजाची तशी मानसिकताच झालेली आढळते. या भक्तीच्या प्रदर्शनात आपण सामाजिक शांततेची हानी किती करत आहोत याचा विचारच करत नाही. आता तर गणेशोत्सव आणि डीजे हे एक समीकरणच होऊन गेले आहे. खरेतर गणेशोत्सव म्हणजे ढोलताशांचा गजर. पण गणेशोत्सव असो अथवा कोणताही सण असला की आपण मोठमोठय़ाने डीजे लावून भक्तीचे प्रदर्शन करीत असतो, आपला तो जन्मसिद्ध हक्कच आहे असेही आपण समजू लागलो आहोत. त्यातूनच डीजेच्या आवाजावर भक्तीचे मोजमाप ठरवू लागलो आहोत. गणेशोत्सवात डीजे लावून, फटाके फोडून, प्रदूषण करून आपण काय साध्य करीत आहोत…या आवाजाचा लहान मुलांवर, ज्ये÷ व्यक्तींना किती त्रास होतो याची आपण जाणीवच ठेवत नाही. गणेशोत्सवात बहुतेक वेळा या डीजेवर महिलांचा अपमान करणारी  अश्लील गाणी लावतो आणि सगळय़ात वाईट म्हणजे या गाण्यावर महिलाही नाचत असतात. यात कोणती धर्मिकता आपण जपतो आहोत याचा आता विचार करण्याची वेळ सगळय़ांवरच आली आहे. त्यामुळे या वषीपासून आनंददायी, आरोग्यदायी डीजे-मुक्त, फटाके-मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करून तो अमलात आणूया. कोणताही धार्मिक उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक म्हणूनच साजरा होत असतो. महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ केला. मात्र अलीकडच्या काळात जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली गणेशोत्सवासारख्या भक्तीमय वातावरणातही धार्मिक उन्मादाचे वातावरण तयार केले जाऊ लागले आहे, हे अत्यंत वाईट आहे. एकाच धर्मातील माणसे भेदाभेद निर्माण करतात हे गेल्या वर्षीच्या ‘खोले’ प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. देवाने माणसाचे दुःख, दैन्य अवस्था दूर करावी या मागणीसाठी आपण एखादा सण साजरा करत असू आणि त्याच भूमीवर सणांच्या नावाखाली जातीचे आणि धर्माचे आक्रमण होत असेल तर कोणताही सहिष्णू धार्मिक विचाराचा माणूस आतून हलून जातोच. कारण त्याला फक्त त्या भूमित जातीचे-धर्माचे प्रदूषण होत असल्याचाच त्रास होत नाही तर त्यातून एकसंध समाज दुभंगत जात असल्याची वेदना त्याच्या आत सतत सलत राहते. अशा सणाच्या काळात तर धर्माचा बाजार व्हायला लागला की भक्तीचाही बाजार होतोच. असा अनुभव आपण सध्या सर्वत्र घेत आहोत. यातूनच मग धर्माच्या बाजारातून देवाच्या नावाने चांगभलं म्हणत आपलेही उखळ पांढरे करून घेण्याची स्पर्धाच जणू लागलेली दिसत आहे. समाजाचे प्रबोधन करण्याचे उपक्रम याच बाजारात राबवले जातात आणि समाजात भेदाभेद निर्माण करण्याची एक प्रक्रिया त्यातूनच छुप्या पद्धतीने इथेही राबवली जाते आहे. बाजारू देव-भक्ती आणि जात-धर्म हातात हात घालून एकत्र नांदत असतात तेव्हाच अशा गोष्टी घडत असतात. तरीही आपण इथे आपल्या भक्तीचा एवढा मळा फुलवतो की डोळय़ावर झापडबंद पट्टी बांधून घेत डोळसपणे या बाजाराला पाहण्याची दृष्टीही आपण विस्तारत नेत नाही. याला माणसाची जगण्याची असहाय्यता कारणीभूत आहेच. या असहाय्यतेतूनच माणूस आपल्या आयुष्याच्या अंधारात उजेड शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो उजेड त्याला प्राप्त होतो का? तर याचे उत्तर नकारात्मकच येते. कारण देवावरच्या श्रद्धेचा आपल्या मनात एक हळवा कोपरा आपण जपलेला असतो, त्यातूनच दुसऱयाबद्दलची सहृदयता सतत आपल्या मनात वाहत असते. पण आता मात्र आपण भक्तीचे असे मार्पेटिंग केले की आपल्या हृदयातील ही एकमेकाबद्दलची सहृदयताच लयास गेलेली अनुभवास येत आहे. त्यामुळेच देवावर श्रद्धा ठेवणारा वर्गही ती डोळसपणे ठेवत नसल्याने देवाच्या नावाखाली जे काय चालते आणि त्याचा फायदा उठवत जो वर्ग आपलीच तुंबडी भरून घेण्यासाठी कार्यरत असतो त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्षच करत आहोत. आणि त्यातूनच समाज नागवला जात आहे! आपण हिंदू आहोत आणि तशा सभोवतालच्या बालपणाच्या वातावरणाने त्यामुळे साहजिकच आपले आचरण तसे असण्यात आणि हिंदुंचे धार्मिक सण साजरे करण्यात काहीच भय बाळगण्याचे कारण नाही. उलट असे सण साजरे करतानाही इतर धर्मियांना आपल्या सणात सहभागी करून घ्यायला हवे. त्यातूनच सामाजिक सलोखा वाढत जात असतो. पण गेली काही वर्षे आजूबाजूच्या होत चाललेल्या प्रखर आणि विखारी वातावरणामुळे आपण हिंदू असूनही हिंदू सणातच बहुसंख्यातील एक आपण वेगळे ठरण्याची शक्यता राहताना दिसते आहे. कारण आपल्यावर बालपणापासून ‘सण उत्सव म्हणजे सर्व धर्म समभावाची एकात्मता’ हेच बिंबवले गेले आणि आताही आपण तसेच आपले आचरण ठेवायला बघत असतो. मात्र आज तसे वातावरण नाही. ही आजच्या उत्सवांची शोकांतिका आहे. कोणताही धर्म दुसऱयाच्या धर्माचा आदर करा असे शिकवतो. पण आता तर प्रत्येक धर्माचे रक्षक धर्माचे ठेकेदार बनलेले दिसतात. आज कुठलेही चॅनल लावा, कोणताही उत्सवाचा कार्यक्रम बघा धर्माचे संरक्षक म्हणवून घेणारे लोक तावातावाने कडवेपणाने बोलताना दिसतात. हिंदू धर्मिय असणाऱया प्रत्येकाच्या घरातच अनेक देव असण्याची शक्यता असते. त्याची पूजा रोज सकाळ-संध्याकाळ केली जाते. त्यात एक निरागस भाव असतो.   अर्थात ही धर्म संस्कृती वाहती होती. खरेतर संस्कृती खडकासारखी स्थिर कधीच नसते. ती वाहती असते म्हणूनच तिच्यात नित्यनवेपण सापडत असते आणि त्यातूनच ती अधिक सहिष्णू बनत असते. पण आता कोणत्याही सणाला धार्मिक उन्माद लाभायला लागल्यापासून संस्कृतीचे हे वाहतेपण संपून गेले आहे आणि यातून माणसाचेच मन खडकासारखे बनले आहे. अशाही वातावरणात हे गजानना आता तुझे आगमन होत आहे ही किती आनंदाची घटना आहे.

तू तर सुखकर्ता, दुःखहर्ता…तुझ्या आगमनाने सारा आसमंत उजळू दे, सर्वांना सुबुद्धी मिळू दे, अनेकांच्या खडकासारख्या मनाची अवस्था, धार्मिक उन्मादाची वृत्ती निखळून पडू दे रे बाप्पा…!

Related posts: