|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जयघोष ‘गणपती बाप्पा मोरया’चा

जयघोष ‘गणपती बाप्पा मोरया’चा 

अवघा जिल्हा ‘गणेशमय’ : आरत्या, भजनांनी आसमंत दुमदुमला

प्रतिनिधी / कणकवली:

‘विघ्नहर्ता’ अशी मान्यता पावलेल्या आणि भक्ती-श्रद्धेच्या भावनेतून जिल्हय़ातील घराघरात दरवर्षी भक्तीभावाने विराजमान होणाऱया ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. भक्तिपूर्ण वातावरणात श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या अखंड जयघोषात, ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. विधिवत पूजनात आबालवृद्ध भक्तिभावाने सहभागी झाले होते. जिल्हय़ात 35 ठिकाणी सार्वजनिक, तर 68 हजार 219 ठिकाणी घरगुती श्री गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. आरत्या, भजनांनी जिल्हा दुमदुमून गेला आहे.

श्री गणेशाचे आगमन दरवर्षी मोठय़ा उत्साहात, भक्ती व श्रद्धेच्या अखंड गुंफनामध्ये होत असते. आबालवृद्ध यात तेवढय़ाच तल्लिनतेने व आनंदाने सहभागी होतात. श्री गणेशाच्या आगमनासाठीची तयारी महिनाभर अगोदरच घराघरांतून सुरू होती. यावर्षी गणेशोत्सवादरम्यान पाऊस नसल्याने व बाहेर मोकळे वातावरण असल्याने हा उत्साह द्विगुणित झाल्याचे दिसत होते.

घरोघरी श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापणेसाठी ‘माटवी’ सजविण्यासोबतच आकर्षक मखरे, रोषणाई करण्यात आली होती. श्रींच्या प्रतिष्ठापणेनंतर पहिल्या दिवशीपासूनच सत्यानारायण महापूजा, आरती, भजने, फुगडी अशा धार्मिक कार्यक्रमांनाही सुरुवात झाली. जिल्हय़ात श्री गणेशाच्या उत्सवाचा हा कालावधी पाच, सात, अकरा ते एकवीस दिवसांपर्यंत सुरू असतो. दरम्यान, शुक्रवारी ऋषिपंचमीही मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. 15 रोजी गौरी आवाहन, 16 रोजी गौरी पूजन, तर 17 रोजी पाचव्या दिवशी गौरी गणपतीचे विसर्जन होणार आहे.