|Monday, February 17, 2020
You are here: Home » क्रिडा » उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली रंगणार कबड्डी..कबड्डी!

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली रंगणार कबड्डी..कबड्डी! 

आशियाई संघ निवडीत अन्याय झाल्याचे प्रकरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय क्रीडा इतिहासात प्रथमच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आज (दि. 15) सकाळी 11 वाजता कबड्डी सामना पाहण्यासाठी राजधानीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर जातीने हजर राहणार आहेत. अर्थात, ही उपस्थिती कोणत्याही उद्घाटन व सांगता सोहळय़ासाठी नव्हे तर चक्क एका प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आहे. अलीकडेच आशियाई स्पर्धेत कबड्डी संघनिवडीत अनेक गैरप्रकार रंगल्याचे आरोप झाले आणि त्यावरुन माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू महिपाल सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू व वगळले गेलेले खेळाडू यांच्यात सामना आयोजित करण्याचा आदेश दिला. हा सामना ते स्वतः पाहणार आहेत.

मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन व न्या. व्ही. के. राव यांनी हौशी भारतीय कबड्डी संघटनेला याबाबतचा आदेश जारी केला. त्यानुसार, आज सकाळी 11 वाजता सदर सामने होतील. दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. पी. गर्ग येथे निवड प्रक्रियेचे निरीक्षक म्हणून काम पाहतील.

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू महिपाल सिंग यांचे वकील बी. एस. नागर या प्रक्रियेची माहिती देताना म्हणाले, ‘आशियाई स्पर्धेत ज्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आणि जे वगळले गेले, त्यांच्यात पुरुष व महिला गटात सामने होतील. राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात जे सहभागी होते, ते ही येथे खेळतील. आशियाई स्पर्धेत जे भारतीय संघातर्फे खेळले, त्यांच्यावर या सामन्यात सहभागाची कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. पण, स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासाठी ही उत्तम संधी असेल. जे आशियाई स्पर्धेत खेळले, ते आता न्यायालयाच्या देखरेखीखाली होणाऱया या लढतीत खेळण्यास नाखुश आहेत, असेही आम्ही ऐकले. एकंदरीत ज्या खेळाडूंना वगळले गेले, ते आपल्याला पराभूत करतील, अशी भीती त्यांच्या मनात असू शकते’.

यंदा आशियाई चषक स्पर्धेसाठी संघनिवडी जाहीर झाल्या, त्याचवेळी महिपाल सिंग यांनी आशियाई स्पर्धा संघ निवड चाचणीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतली. संघनिवडीसाठी लाचखोरी झाल्याचा त्यांनी दावा केला. हौशी कबड्डी संघटनेच्या व्यवस्थापनाची धुरा ज्येष्ठ राजकारणी जनार्दन सिंग गेहलोत यांच्याकडे असून त्यांच्या पत्नी मृदूल भादुरिया याच सध्याच्या अध्यक्षा आहेत. गेहलोत सध्या आंतरराष्ट्रीय कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत.

आज न्यायालयाच्या देखरेखीखाली होणाऱया लढतीत सर्व निवडीची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष सामने यांचे रेकॉर्डिंग केले जाणार असून त्याची प्रतही न्यायालयात हजर केली जाणार आहे. 3 निवडकर्ते संघनिवड करणार आहेत. आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघातून खेळलेले अनेक खेळाडू या घडामोडींवर प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत तर काहींनी प्रतिक्रिया देण्यास नकारही दिला. उच्च न्यायालयाने सामन्याबद्दल काहीही म्हटले नाही, फक्त निवड प्रक्रियेबद्दल त्यांनी म्हटले आहे, असा दावा यातील काहींनी केला. नागर यांच्या मते मात्र आशियाई निवड चाचणीच गैरप्रकारे झाली असून पात्र खेळाडूंना त्यातून वगळले गेले होते.

यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला दक्षिण कोरियाने साखळी फेरीतच नमवले व उपांत्य फेरीत इराणने नमवल्यानंतर भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यामुळे, भारताचे आशियाई कबड्डीतील 28 वर्षांचे साम्राज्य खालसा झाले. त्यानंतर महिलांचा संघ देखील अंतिम फेरीत इराणविरुद्धच पराभूत झाला. यापूर्वी त्यांनी 2010 व 2014 मधील आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. पण, येथे त्यांची सद्दीही संपुष्टात आली.

Related posts: