|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जारकीहोळी बंधूना हायकमांडकडून ताकीद

जारकीहोळी बंधूना हायकमांडकडून ताकीद 

प्रतिनिधी/ बेंगळूर

कर्नाटक राज्य काँग्रेसमध्ये उद्भवलेल्या वादासंबंधी शनिवारी नवी दिल्ली येथे अखिल भारत काँग्रेसच्या समन्वय समितीच्या बैठकीत गंभीरपणे चर्चा झाली. यावेळी जारकीहोळी बंधूंच्या भूमिकेविषयी आक्षेप घेण्यात आला. जारकीहोळी बंधूंची नाराजी आणि त्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर घडलेल्या घडामोडींविषयी राज्य काँग्रेस प्रभारी के. सी. वेणुगोपाल यांनी पक्ष श्रेष्ठींना सविस्तर अहवाल सादर केला होता.

राज्य काँग्रेस प्रभारी वेणुगोपाल यांनी सादर केलेला अहवालाच्या आधारे शनिवारी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी बेळगावमधील पीएलडी बँकेची निवडणूक समोर ठेवून जारकीहोळी बंधूंनी प्रतिष्ठेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे पक्षाच्या हिताला धक्का पोहोचला आहे. पीएलडी बँकेच्या निवडणुकीनंतर जारकीहोळी बंधूंनी पक्षातील काही आमदारांना आपल्या सोबत येऊन बंडखोरीचा पवित्रा घेतला. त्यांची समजूत काढण्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी प्रयत्न करून सुद्धा जारकीहोळी बंधूंनी नरमाईची भूमिका घेतली नाही. त्यांनी पक्ष हिताविरुद्ध केलेली वर्तणूक समर्थनीय नाही असा उल्लेख के. सी. वेणुगोपाल यांनी आपल्या अहवालात केला आहे.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील प्रतिष्ठेपोटी इर्षेने राजकारण केल्याने पक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यामुळे भाजपला काँग्रेस विरुद्ध डावपेच आखण्यास आपण स्वतः मोकळे रान करून दिले आहे. युती सरकार सुस्थितीत कामकाज हाताळत असताना पक्षांतर्गत गोंधळ निर्माण होऊ देऊ नये. त्याकरिता आपला हस्तक्षेप महत्त्वाचा आहे असा उल्लेख राहुल गांधी यांच्याकडे वेणुगोपाल यांनी सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार राहुल गांधी यांनी पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

काँग्रेस हायकमांडने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात बंडाळीचे प्रयत्न सुरूच राहिल्यास कठोर कारवाई करणे अनिवार्य ठरेल असा इशारा काँग्रेस हायकमांडने दिला आहे.