|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सैतानाचे घर ओकतेय आग

सैतानाचे घर ओकतेय आग 

पीक ऑफ द फर्नेसमधून बाहेर पडतोय लाव्हा : फ्रान्समधील ज्वालामुखी

वृत्तसंस्था/ पॅरिस

 जगातील अनेक देश जागृत झालेल्या ज्वालामुखीचा तडाखा झेलत आहेत. ज्वालामुखीमुळे अमेरिका तसेच इंडोनेशिया समवेत अनेक ठिकाणी जीवित-आर्थिक हानी झाली आहे. हवाई, ग्वाटेमाला, इक्वेडोर आणि इंडोनेशियानंतर आता दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या प्यूकोनमध्ये अँडीज पर्वतरांगेत स्थित विलारिका ज्वालामुखी, इटलीच्या एटना आणि फ्रान्सच्या पीक ऑफ द फर्नेसने देखील लाव्हारस बाहेर टाकण्यास प्रारंभ केला आहे.

केवळ तीन दिवसांच्या कालावधीत याचे भयावह स्वरुप समोर आले आहे. एटना येथून धूर तसेच राख बाहेर पडण्यास प्रारंभ झाला आहे. तर पीक ऑफ द फर्नेसमधून लाव्हारसाचा प्रवाह सातत्याने वाहतोय. एटनाने 2017, 2013 आणि 2012 मध्ये स्वतःचे विध्वसंक स्वरुप दर्शविले होते. दर 1 हजार वर्षांनी यात विस्फोट होतो, ज्यानंतर परिसरातील सर्वकाही जळून भस्म होते अशी तेथे वदंता आहे.

अँडीज पर्वतरांगा

विलारिका ज्वालामुखी स्थित असलेली अँडीज ही जगातील सर्वाधिक लांबीची पर्वतरांगा आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱयावर ही पर्वतरांगा असून सुमारे 7 हजार किलोमीटर लांब तर 200 किलोमीटर रुंदी असलेल्या या पर्वतरांगेची सरासरी उंची 13 हजार फूट आहे. दक्षिण अमेरिकेच्या अर्जेंटीना, चिली, बोलिविया, पेरू, इक्वेडोर आणि व्हेनेझुएला या देशांमधून ही पर्वतरांगा जाते. परंतु चिलीत याचा विस्तार सर्वाधिक आहे. जगातील सर्वाधिक उंच आणि सक्रीय ज्वालामुखी ‘ओजस डेड सालाडो’ याच पर्वतरांगेत अर्जेंटीनöचिली देशाच्या सीमेवर स्थित आहे.

 ग्वाटेमालात मोठे नुकसान

जून महिन्यात ग्वाटेमाला येथे झालेल्या ज्वालामुखी विस्फोटामुळे 70 जणांचा मृत्यू झाला होता. फ्यूएगो ज्वालामुखीच्या क्षेत्रातील कित्येक जण अद्यापही बेपत्ता आहेत. या ज्वालामुखीतून बाहेर पडणारे धूराचे लोट सुमारे 40 किलोमीटर अंतरावरून पाहता येत होते.

विलारिका ज्वालामुखी

विलारिका हा चिलीतील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. याला रुकापिलान देखील म्हटले जाते, ज्याचा अर्थ ‘सैतानाचे घर’ असा होतो. चिलीत 900 फूटांच्या उंचीवर असलेल्या या ज्वालामुखीतून सातत्याने लाव्हारस बाहेर पडतोय. धोका पाहता परिसरातील सर्व नागरिकांना हलविण्यात आले आहे. हा ज्वालामुखी 1558 मध्ये पहिल्यांदा जागृत झाला होता. यानंतर 1640 आणि 1648 मध्ये याचे विक्राळ स्वरुप दिसून आले होते. तेव्हापासून हा ज्वालामुखी 54 वेळा जागृत झाला आहे. मार्च 2015 मध्ये या ज्वालामुखीतून कित्येक टन लाव्हारस आणि राख बाहेर पडली होती.

इक्वेडोरचा नेग्रा ज्वालामुखी

दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये गलपागोस बेटसमुहाच्या इजाबेला बेटावरील सिएरा नेग्रा ज्वालामुखी जागृत झाला असून यामुळे तेथील परिसरात लाव्हारस पसरू लागला आहे. गलपागोस हे जगातील सर्वाधिक ज्वालामुखीय सक्रीय क्षेत्रांपैकी एक आहे. अद्भूत जैववैविध्य आणि पर्यावरणामुळे गलपागोसमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. परंतु ज्वालामुखीमुळे या क्षेत्राला फटका बसला.

कलबूको ज्वालामुखी

एप्रिल 2015 मध्ये दक्षिण चिली येथील कलबूको ज्वालामुखी जागृत झाल्याने आकाश धूराने झाकोळले गेले होते. त्यावेळी बाहेर पडणारा धूर तसेच राखेचे लोट सुमारे 20 किलोमीटर अंतरावरून देखील पाहता येत होते. या अगोदर 1972 मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाला होता, त्यावेळी पुएटो मोंट येथील विमानतळ बंद ठेवावे लागले होते.

हवाई ज्वालामुखी

अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात मे महिन्यात ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता. तेथून बाहेर पडणारा लाव्हारस थेट प्रशांत महासागरात शिरत होता. या लाव्हारसामुळे हवाई क्षेत्रात विषारी वायू पसरला होता. तप्त लाव्हारस समुद्रात जात असल्याने टॉक्सिक पदार्थाची निर्मिती होते, जो अत्यंत धोकादायक असतो.

Related posts: