|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ‘बुलंद’केसरी

‘बुलंद’केसरी 

देशविदेशातील कुस्तीची मैदाने गाजविण्याबरोबरच अखेरच्या श्वासापर्यांत कुस्तीपटू घडविण्याचा ध्यास बाळगणाऱया हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या निधनाने एका मल्लयोगीलाच देश मुकला आहे. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ मानला जातो. महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून  देत देशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवत ठेवला. खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक पटकावत या खेळात भारताच्या खात्यात पहिल्यावहिल्या पदकाची नोंद केली. खाशाबांचा हा वारसा लाल मातीतल्या अनेक मल्लांनी पुढे नेला. त्यात गणपतराव आंदळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सांगलीतील शेतकरी कुटुंबातून आलेल्या गणपतरावांनी जवळपास सहा ते सात दशके कुस्तीची अखंडपणे सेवा केली. कोल्हापुरातील मोतीबाग तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे त्यांनी खऱया अर्थाने कुस्तीचे धडे गिरवले. बळकट शरीरयष्टीला,  चिकाटी, चापल्य व सातत्याची जोड देत त्यांनी स्वत:मधील कुस्तीगीर सतत अपडेट ठेवला. संपूर्ण कारकिर्दीत 200 पेक्षा अधिक कुस्त्या करणाऱया या पट्ठय़ाने आपली गुणात्मकताही वेळोवेळी दाखवून दिली. जय-पराजय हा खेळाचा भाग असतो. मात्र, जेतेपदाने हुरळून जायचे नाही आणि पराजयाने कोसळून जायचे नाही, ही वास्तववादी जाणीव त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे जय-पराजयाच्या पलीकडे जाऊन कुस्तीतला आनंद ते घेऊ शकले. 1960 मध्ये लाल मातीतल्या प्रतिष्ठेच्या हिंदकेसरी स्पर्धेतही त्यांनी बाजी मारली. पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या पाठोपाठ दुसरे हिंदकेसरी होण्याचा बहुमान त्यांनी या माध्यमातून पटकावला. मात्र, केवळ हिंदकेसरीपुरते सीमित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी आपला बहुमोल ठसा उमटविला. म्हणूनच महाराष्ट्र केसरी वा हिंदकेसरीवर समाधान मानणाऱया महाराष्ट्रातील आजच्या कुस्तीगीरांना त्यांची ही झेप मार्गदर्शक ठरते. गणपतरावांचे वैशिष्टय़ म्हणजे ग्रीको रोमन व फ्री स्टाईल या दोन्ही शैलींवर त्यांची असलेली मजबूत पकड. आपल्या या चतुरस्त्र खेळाच्या बळावरच त्यांनी भल्याभल्या मल्ल्यांना अस्मान दाखविले. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनीफ यांच्याबरोबरच्या गाजलेल्या कुस्त्याही त्यांच्यातील दमदार कुस्तीगीराचेच दर्शन घडवतात. 1962 मध्ये जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुपर हेवीवेट गटात ग्रीको रोमन प्रकारात सुवर्णपदक, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदकावर मोहोर उमटवत त्यांनी आपला दर्जा दाखवून दिला. 1964 मध्ये टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत हेवीवेट विभागात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱया या बुलंदकेसरीने चौथ्या फेरीपर्यंत मजल मारत तेथेही आपली चुणूक दाखवून दिली. कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांची कुस्तीशी असलेली नाळ सदैव कायम राहिली. कारण कुस्ती ही त्यांच्या रक्तातच होती. मल्ल म्हणून नावलौकिक मिळविणाऱया या हिंदकेसरीने वस्ताद म्हणूनही आपला दबदबा निर्माण करणे, हा त्यांच्या कारकिर्दीचा विशेष मानावा लागेल. म्हणूनच आपल्या दुसऱया इनिंगमध्ये प्रशिक्षक व संघटक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अफलातून व अव्वल दर्जाची ठरते. पोरं हेरणे, त्यांना डावपेच शिकवणे अन् त्याच्यातून चांगला मल्ल घडवणे, ही त्यांची खासियतच होती. रुस्तम ए हिंद दादू चौगुले व राम सारंग हे त्यांचेच पठ्ठे. दादू चौगुले यांनी ऑकलंड राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक, तर राम सारंग यांनी ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. याशिवाय महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, संभाजी वरूटे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अशा अनेक मल्लांनी त्यांच्याकडून कुस्ती आणि त्यातील तंत्रावर हुकूमत मिळविण्याचे कौशल्य आत्मसात केले. अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव, कोल्हापूर भूषण, शाहू पुरस्कार अशा अनेकविध पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या या मल्लयोग्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्टय़ कोणते असेल, तर त्यांच्या कुस्त्यांनी व त्यांनी लोकांच्या हृदयातही स्थान मिळविले. अत्यंत साधे राहणीमान असणाऱया गणपतरावांचा स्वभाव मितभाषी होता. मात्र, त्यांची कुस्ती बोलकी असायची. एकदा का ते मैदानात उतरले, की अवघा आखाडा हा त्यांचाच होऊन जायचा. इतकी कुस्तीवर त्यांची पक्की मांड होती. आता या हिंदकेसरीने जगाचा निरोप घेतला असला, तरी यापुढेही कुस्तीतील त्यांचे स्थान अढळच राहणार आहे. वास्तविक कुस्ती हा अस्सल भारतीय खेळ आहे. प्राचीन काळी मल्लविद्या या नावाने हा खेळ ओळखला जाई. मात्र, मॅटचा जमाना, नवनवीन नियम यामुळे आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीसे मागे पडताना दिसतात. खाशाबांनंतर कुस्तीत पदक मिळायला आपल्याला 2008 साल उजाडावे लागले. याच वर्षात ऑलिंपिकमध्ये सुशीलकुमार याने कांस्य पटकावत भारताचा तिरंगा फडकवला. त्यानंतर पुन्हा सुशीलकुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांनी पदके प्राप्त केली असली, तरी आपल्या हक्काच्या खेळात आपल्याला अधिकाधिक पदके मिळायला हवीत. त्यासाठीची भूमी गणपतरावांसारख्या मार्गदर्शकांनी निश्चित तयार करून ठेवली आहे. गरज आहे, ती पाय रोवून उभे राहण्याची अन् परिश्रम व इच्छाशक्ती दाखविण्याची. त्यादृष्टीने महाराष्ट्रासह देशातील मल्लांनी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य देत नवनवीन तंत्रे अंगी बाणवली पाहिजेत. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या विकासदरावर मोजता येत नाही. तर त्या देशातील क्रीडासंस्कृती कशी आहे, हेदेखील महत्त्वाचे असते. गणपतरावांच्या जमान्यात अपुऱया सुविधांसह प्रशिक्षणाचाही अभाव होता. आज फार स्थिती सुधारली आहे, अशातला भाग नाही. हे पाहता त्यादृष्टीने पावले उचलावी लागतील. गणपतरावांच्या निधनाने आज भारताचा ‘बुलंद’केसरीच आपण गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी शासनानेही या खऱयाखुऱया भारतीय खेळाला अधिकाधिक बळ द्यावे, अशीच सर्वांची अपेक्षा असेल.

Related posts: