|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » पाकने दाखविले ‘खायचे दात’

पाकने दाखविले ‘खायचे दात’ 

कर्तारपूर प्रकरणी सिद्धू पुन्हा उघडय़ावर

वृत्तसंस्था / इस्लामाबाद

 पाकिस्तानात असलेले शीखांचे पवित्र तीर्थस्थान कर्तारपूरला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानने केली आहे. त्यामुळे काँगेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची पुन्हा कोंडी झाली आहे.

पाकचे नवोदित पंतप्रधान इम्रानखान यांच्या शपथविधीसाठी सिद्धू गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. कर्तारपूरला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देऊ असे आश्वासन बाजवा यांनी दिल्यानेच आपण त्यांची गळाभेट घेतली, अशी सारवासारवी नंतर सिद्धूने केली होती. तथापि, आता पाकने अशी चर्चा झाल्याचेच नाकारल्याने सिद्धूचा बचाव उघडय़ावर पडला आहे.

पाकच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी बुधवारी साप्ताहिक पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना हा खुलासा केला. भारतातील कोणाही नेत्याबरोबर कर्तारपूर प्रकरणी चर्चा झालेली नाही. तसे वृत्त तथ्यहीन आहे. त्यामुळे अशा वदंतांवर कोणी विश्वास ठेवू नये, असे वक्तव्य त्यांनी केले.

भारताचाही नकार

कर्तारपूर प्रकरणी पाककडून कोणाताही प्रस्ताव आल्याचा, किंवा पाकला कोणताही प्रस्ताव दिल्याचा भारतानेही अनेकदा इन्कार केला आहे. तीन दिवसांपूर्वी सिद्धू यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. त्यावेळीही स्वराज यांनी सिद्धू यांना अनधिकृत वक्तव्ये करून गोंधळ निर्माण केल्याबद्दल कानपिचक्या दिल्या होत्या. तरीही सिद्धू यांनी स्वतःच्या विधानावर ठाम रहात, भारत सरकारलाच पाकशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेण्याचा अनहूत सल्ला दिला होता.

मात्र आता पाकिस्ताननेच या प्रकरणावर प्रकाश टाकल्याने स्थिती स्पष्ट झाली आहे. बुधवारी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सिद्धू यांनी आपली पाक भेट खासगी असल्याचे तसेच तिचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र या प्रकरणावर आतापर्यंत त्यांनी दिलेले प्रत्येक व्यक्तव्य राजकारणाशीच संबंधित आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारत सरकारनेही सिद्धूच्या वक्तव्याचा अनेकदा इन्कार केला आहे. तरीही यासंबंधी निर्माण झालेला वाद अद्यापही सुरू आहे. आता त्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

अधिकृत चर्चा नाही

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. कर्तारपूर हा विषय राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असल्याने त्यावर उच्च पातळीवरूनच चर्चा होणे आणि त्यानंतर निर्णय होणे आवश्यक आहे, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

Related posts: