|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘त्या’ मांत्रिक खासदाराला जनताच बाटलीबंद करेल

‘त्या’ मांत्रिक खासदाराला जनताच बाटलीबंद करेल 

टोप / वार्ताहर :

प्रत्येक निवडणुकीत ऊस व दूध दराचे भूत उभाकरुन मते मागणाऱया मांत्रिक खासदाराला येत्या निवडणुकीत बहुजन जनता बाटलीबंद केल्याशिवाय राहणार नाही. खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात मुख्यमंत्री व पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणुक लढविणार असल्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टोप येथे सदिच्छा भेटीप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  रूपाली तावडे होत्या. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, टोप विकास पॅनेलचे प्रमुख तानाजी पाटील, पं. स. सदस्य डॉ. प्रदीप पाटील, उपसरपंच विठ्ठल पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

 मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, विद्यमान खासदार हे प्रत्येक वर्षी आंदोलनाचे नाटक उभे करतात. या वर्षी ऊस दरासाठी होणारे आंदोलन हे कारखानदार प्रायोजित आंदोलन असणार आहे, असे भाकीत करत ऊस दरासाठी होणाऱया संभाव्य आंदोलनाची कुंडलीच मांडली. प्रत्येक आंदोलनात मीसुद्धा अनवाणी चाललोय पण पायाचे फोड आणि बांधलेल्या चिंध्याचे मी राजकारण केले नाही. भावनीक साद घालून मते मागण्यासाठी विकासाचे राजकारण करा व निवडणुकीच्या सुगीत अस्वलरुपी खेळ करणाऱया दरवेशास बहुजन समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. दुधाच्या आंदोलनाचे भांडाफोड करताना मंत्री खोत यांनी 5 रु. दरवाढीसाठी केलेल्या आंदोलनातून फक्त 2 रुपये मिळाले. याचा अर्थ पांढऱया दुधातील काळे बोके कोण, हे आंदोलन करणाऱयांनीच जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले. निवडणूक काळात प्रतिस्पर्धी उमेदवाराला बदनाम करण्यात खासदारांचा हातखंडा असून, माझ्यावर सोडल्या जाणाऱया कोणत्याही बाणाला उत्तर देणारा बाण माझ्या भात्यात तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.