पाकच्या ‘रेडिओ’ अस्त्राला भारत देणार प्रत्युत्तर

साहित्य, संस्कृतीने करणार प्रतिवार
अमृतसर / वृत्तसंस्था
सीमेवर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत आता रेडिओ अस्त्राचा वापर करणार आहे. भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अटारीच्या घरिंडा गावातील पाकिस्तानच्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने हे अनोखे पाऊल उचलले आहे. 20 किलोवॅट फ्रिक्वेंसी मॉडय़ूलेशन (एफएम) ट्रान्समिटर सप्टेंबरपासून अमृतसरचे पहिले एफएम रेडिओ प्रसारण 24 सप्टेंबरपासून सुरू करणार आहे. केवळ भारतच नव्हे तर सीमेपलिकडील पाकिस्तानच्या शेखुपुरा, मुरीदके, कसूर, ननकाना साहिब आणि गुजरनवालापर्यंत एफएम वाहिनी ऐकता येणार आहे.
पाकिस्तान सरकारचा रेडिओ कार्यक्रम पंजाबी दरबारच्या प्रसारणानंतर भारत सरकारचे हे पाऊल अनिवार्य ठरले होते. ऑल इंडिया रेडिओ आणि सीमावर्ती भागांच्या रहिवाशांनुसार पंजाबी दरबार 30 वर्षांपासून भारताच्या विरोधात दुष्प्रचार करत आहे. पाकिस्तानी रेडिओद्वारे खलिस्तानला देखील प्रोत्साहन दिले जाते. भारतीय पंजाबच्या लोकांना जरनैल सिंग भिंद्रावालेची भाषणे आज देखील ऐकविली जातात.
भारताकडून दुष्प्रचार नाही
पाकिस्तानी रेडिओच्या दुष्प्रचारावर नजर ठेवणाऱया अधिकाऱयांनी भारत आता एएम सेवा बंद करून एफए तंत्रज्ञानांतर्गत 5 दशके जुना कार्यक्रम देस पंजाबचे प्रसारण करणार असल्याचे सांगितले. या कार्यकमामुळे भारत सीमेपलिकडेच श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकेल. भारत पंजाबी दरबारला दुष्प्रचाराने प्रत्युत्तर देणार नाही. तर गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल अणि पाकिस्तानातून देखील यासाठी पत्रे मिळाल्याचे एआयआरच्या अधिकाऱयाने सांगितले. एफएम 130.6 वर दररोज देस पंजाब कार्यक्रम दोन तास चालणार आहे. यात ‘जवाब हाजिर है, गुलदस्ता, राब्ता’ यासारख्या सांस्कृतिक आणि साहित्याशी निगडित कार्यक्रम समाविष्ट असतील. सीमेनजीक होत असलेली विकासकामे, वैद्यकीय, शिक्षण आणि पायाभूत सुविधांबद्दल माहिती दिली जाणार आहे.
भारताच्या विरोधात प्रसारण
दररोज संध्याकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत चालणाऱया कार्यक्रमाची सुरुवात शिख धार्मिक प्रार्थनांद्वारे होते. पाकिस्तानी रेडिओच्या कार्यक्रमात भारतीय पंजाबमधील रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे तसेच अन्य समस्या तीव्र झाल्याची ओरड करण्यात येते. तसेच भारतीय पंजाबचे लोक पत्र लिहून याबद्दल चिंता व्यक्त करत असल्याचा कांगावाही पाकिस्तानी रेडिओ वाहिनीकडून केला जातो.