आजी-माजी आमदारांची माओवाद्यांकडून हत्या

आंध्रप्रदेशमध्ये दिवसाढवळय़ा घडलेल्या घटनेने खळबळ
विशाखापट्टनम / वृत्तसंस्था
आंध्रप्रदेशमध्ये दंबारीकुडा भागात तेलगू देसम पार्टीचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमू यांची माओवाद्यांनी रविवारी दुपारी 12 वाजता गोळय़ा घालून हत्या केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने राज्यभर खळबळ माजली आहे. माओवाद्यांनी या दोघांची गोळय़ा घालून हत्या केल्याचे पडेरुचे (विशाखापट्टणम) पोलीस उपअधीक्षक महेंद्र मत्थे यांनी सांगितले. सीपीआय माओवादी स्थापना दिनाचा कार्यक्रम सुरु असताना या हत्या करण्यात आल्या.
विशाखापट्टणम जवळच्या आदिवासी भागात हा हल्ला झाला. गोळी लागल्याने किडारी आणि सिवेरू हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. मात्र, उपचारांचा काहीच परिणाम झाला नाही. किडारी यांचा जागीच मृत्यू झाला तर सिनेरा यांनी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 60 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरक्षेला असलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन त्यांनीच या दोघांवर गोळय़ा झाडल्याची माहिती विशाखापट्टणम पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत यांनी दिली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा निषेध केला आहे. चंद्राबाबू नायडू सध्या अमेरिकेच्या दौऱयावर आहेत.
माओवाद्यांच्या गोळीबारात मरण पावलेले किदारी सर्वेश्वर राव हे अराकू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर सिवेरी सोमा हे माजी आमदार आहेत. ते आदिवासी भागाचे नेतृत्त्व करत होते. ते 2014 मध्ये वायएसआर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण नंतर त्यांनी टीडीपीमध्ये प्रवेश केला होता. सर्वेश्वरा राव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.
60 माओवाद्यांकडून हल्ला
किदारी सर्वेश्वर राव आणि सिवरी सोमा हे दंबारीकुडाच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 60 माओवाद्यांनी एकत्र येऊन हल्ला केला. यामध्ये महिलाही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. माओवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या सर्व राजकारण्यांना नक्षलग्रस्त भागामध्ये जाण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देण्यास सांगितले आहे असे ग्रामीणचे एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितले. किदारी राव यांच्यावर बेकायदा खाणकामाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता. बॉक्साईटच्या खाणकामाला पाठिंबा दिल्याबद्दल याआधी त्यांना माओवाद्यांनी धमकीसुद्धा दिली होती. मागच्या काही दिवसांपासून माओवादी या दोघांच्या मागावर होते. त्यांच्या हालचालींवर नजर ठेऊन होते अशी माहिती सूत्रांनी दिली.