|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘आयुषमान भारत’ योजनेचा भव्य शुभारंभ

‘आयुषमान भारत’ योजनेचा भव्य शुभारंभ 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रांची येथे उद्घाटन, 50 कोटी लोकांना विमा संरक्षण मिळणार

रांची / वृत्तसंस्था

देशातील 10 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण देऊ करणाऱया महत्वाकांक्षी आयुषमान भारत विमा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी विमा योजना मानली जात आहे. या योजनेत लहान मोठय़ा 1 हजार 300 आरोग्य समस्यांचा समावेश करण्यात आला असल्याने ती सर्वंकष असल्याचे म्हटले जात आहे.

या योजनेची माहिती मोदींनी स्पष्ट केली. कोणालाही खरे तर रूग्णालयात जाण्याची आवश्यकताच भासू नये. तथापि, तशी ती भासलीच तर ‘आयुषमान’ योजना त्याच्या साहाय्यार्थ धावून येईल. ही योजना देशातील 10 कोटी कुटुंबांमधील 50 कोटी गरीब लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण देणार आहे.

आतापर्यंत केवळ उपदेश

इतर सरकारांनी आतापर्यंत केवळ गरीबांच्या सबलीकरणाचा जप तेव्हढा केला. पण प्रत्यक्ष कृती केली गेली नाही. गरीबी हटावच्या घोषणा अमाप झाल्या. पण गरीबांच्या आरोग्याची चिंता कोणी केली नाही. अशा घोषणा केवळ गरीबांची दिशाभूल करण्यासाठी केल्या गेल्या. इतर सरकारांनी त्यांच्या योजनांची खरोखरच अंमलबजावणी केली असती, तर देशातील गरीबांची स्थिती आज खूपच चांगली राहिली असती. गरीबांनाही आत्मसन्मान असतो याकडे इतर सरकारांनी दुर्लक्ष केले होते. आपले सरकार मात्र या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मोदींनी केले.

केवळ गरीबांच्या हितासाठी

अनेक लोक या योजनेला ‘मोदीकेअर’ आणि इतर नावांनी संबोधत आहेत. तथापि, ही योजना कोणा एका व्यक्तीच्या नावे ओळखली जाऊ नये. तिचा उद्देश गरीबांच्या हिताचा आहे. व्यक्तीच्या प्रसिद्धीचा नाही. ‘सबका साथ, सबका विकास’ या आमच्या घोषणेचा एक भाग ही योजना आहे, असा दावा मोदींनी केला.

ड 10 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी प्रत्येकी 5 लाखाचे विमा संरक्षण

ड लाभ उठविण्यासाठी लाभार्थी कुटुंबांना 1 आरोग्य कार्ड दिले जाणार

ड देशातील सर्व सार्वजनिक रूग्णालयांशी योजना जोडली जाणार आहे

ड रूग्णालयातून बाहेर आल्यानंतरही रूग्णाची काळजी घेतली जाणार

ड योजनेची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारांकडून केली जाणार

ड प्रत्येक राज्य स्वतःचे आरोग्य प्राधिकरण स्थापून योजना राबविणार

ड 1,357 आरोग्य समस्यांचा समावेश, हृदयासंबंधी 25 आजार समाविष्ट

ड विम्याचा हप्ता राज्य सरकारांच्या आरोग्य प्राधिकरणांकडून निर्धारित