|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाप्पांना निरोप, जल्लोषी समारोप!

बाप्पांना निरोप, जल्लोषी समारोप! 

बाप्पा मोरय्या पुढच्या वर्षी लवकर या …   विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना पसंती : ढोल-ताशांचा गजर : भक्तिमय वातावरण

प्रतिनिधी / बेळगाव

श्रीगणेशाचा उत्साही आणि जल्लोषपूर्ण निरोपाचा सोहळा पहाटेपर्यंत सुरू होता. वाद्यांच्या अखंड गजरात आणि बाप्पांच्या जयघोषात भक्तमंडळींनी निरोपाचा सोहळा साजरा केला. बाप्पांच्या विसर्जन सोहळय़ाच्या जल्लोषाने अवघे शहर दुमदुमले होते. आगळय़ा वेगळय़ा उत्साही जल्लोषाने भरून गेलेल्या वातावरणाने उत्सवाचे वैभव बहरून आले होते. बेळगावसह आसपासच्या भागातून आलेल्या हजारो गणेशभक्तांनी हा अपूर्व सोहळा ‘याचि देही याची डोळा’ अनुभवला आणि बाप्पांना निरोप दिला.

गणपती बाप्पांच्या निरोपाच्या सोहळय़ामध्ये भक्तगणांचा संचार संपूर्ण मार्गावरून सुरू होता. आबालवृद्धांच्या आणि महिला वर्गाच्या प्रचंड उपस्थितीमुळे सर्वच मार्ग फुलून गेले होते. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून होणाऱया बाप्पांच्या गजरामध्ये भक्तगणांचा सूर मिसळत होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे भक्तवर्गाचा उत्साह दुणावला होता. मनावर बाप्पांच्या निरोपाचे दडपण असूनही उत्साह आणि आनंदाचे उधाण घेऊन भक्तांचे थवे हा सोहळा अनुभवत होते.

प्रारंभ वेळेवर, नंतर विलंब

श्री विसर्जनाची मिरवणूक वेळेवर सुरू झाल्यामुळे गणेशभक्त सुखावले होते. परंतु अनेक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत भाग घेण्यास विलंब केला. त्यामुळे मिरवणुकीची गती मंदावली. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मुख्य मिरवणुकीतील अवघ्या चारच श्रीमूर्तींचे विसर्जन कपिलेश्वर तलावात झाले. त्यामुळे भक्त मंडळींना प्रतीक्षा करीत ताटकळत रहावे लागले.

श्री गणेशाच्या विसर्जनासाठी शहर परिसरातील विविध ठिकाणचे तलाव परिसर फुलले होते. मुख्य विसर्जन मिरवणुकीची सांगता होणार असलेल्या श्री कपिलेश्वर तलाव तसेच मंदिराशेजारील श्री कपिलतीर्थ तलाव येथे श्रीमूर्तींचे विसर्जन दुपारपासून सुरू झाले.

 या व्यतिरिक्त श्री रामेश्वरतीर्थ (जक्कीन होंड), किल्ला तलाव, शिवाजी उद्यान विहीर, वडगाव, अनगोळ भागातील तलावांचे परिसरही भक्तांच्या गर्दीमुळे फुलले होते.

आपल्या लाडक्या बाप्पांवर मागील 10 दिवस जीवापाड प्रेम केलेल्या, त्याला भजलेल्या-पूजलेल्या बेळगावच्या गणेशभक्तांची रविवारी विसर्जनाच्या मिरवणुकीत नेमकी अशीच अवस्था झाली होती. भाविकांकडून होणाऱया आदरातिथ्याचा आणि पाहुणचाराचा लाभ घेऊन रविवारी बाप्पांनी निरोप घेतला. ‘चैन पडेना आमच्या मनाला’ अशीच भक्तांची अवस्था झाली होती. अतिशय आकर्षक अशा विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून बाप्पाला पोहोचवून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ची साद भाविकांनी घातली आहे.

रविवारी दुपारी 4.30 वाजता येथील हुतात्मा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने मिरवणुकीतील मानाच्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे पूजन करून मिरवणुकीला चालना दिली. महापौर बसवराज चिकलदिन्नी व उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या हस्ते उद्घाटनपर आरती झाली. जिल्हा पालकमंत्री  रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. बेळगाव उत्तर व दक्षिणचे आमदार, जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर., अप्पर जिल्हाधिकारी एच. बी. बुदेप्पा, पोलीस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, मनपा आयुक्त शशीधर कुरेर, तहसीलदार मंजुळा नाईक, प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर आदींसह माजी महापौर संज्योत बांदेकर, सरिता पाटील, विजय मोरे, सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, नगरसेविका माया कडोलकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटनाला उपस्थित होते.

मिरवणुकीसमोर 101 नारळ वाढविण्याचा उपक्रम

उद्घाटनावेळी मानाच्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील गणपतीपाठोपाठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक, दैवज्ञ युवक मंडळ-जालगार गल्ली येथील  गणपती सहभागी झाले होते. यावेळी बापट गल्ली फुले विक्रेता मंडळींतर्फे सालाबादप्रमाणे मानाच्या गणपतीचे भला मोठा पुष्पहार घालून पूजन व मिरवणुकीसमोर 101 नारळ वाढविण्याचा उपक्रम पूर्ण करण्यात आला. ‘आरंभ’ या नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या ढोल-ताशा पथकाने मिरवणुकीच्या सुरुवातीलाच आपली कला सादर करून शोभा वाढविली. तब्बल 150 जणांच्या या मंडळाने मिरवणुकीचा ‘आरंभ’ दणदणीत केला.

शहरातील उत्सवाचे 113 वे वर्ष

1905 साली झेंडा चौक मार्केटमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. बेळगावातील या उत्सवाच्या वाटचालीत आज शहर व उपनगरात तब्बल 380 हून अधिक मंडळे कार्यरत आहेत. शहरातील उत्सवाचे हे 113 वे वर्ष आहे. यामुळे तितक्याच ऐतिहासिक स्वरुपात आणि पारंपरिकता जपत यंदाचा गणेशोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा झाला. विसर्जन मिरवणुकीच्या उद्घाटनाला सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते.

यावर्षीही मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये झाली. मिरवणुकीच्या प्रारंभीच भले मोठे ढोल आणि ताशे घेऊन दाखल झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चौक येथील कार्यकर्त्यांनी आपल्या पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटाच्या जोरावर लक्ष वेधून घेतले. यंदाच्या मिरवणुकीत आबालवृद्ध आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फक्त बेळगावकरच नव्हे तर खास गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परगावांहूनही भाविक दाखल झाले होते. या गर्दीतून वाट काढत गणरायांना डोळय़ांमध्ये साठवून घेण्याची धडपड सुरू होती. झांज पथके, लेझीम मेळे आणि पारंपरिक बॅन्डचा वापर मंडळांनी अधिक प्रमाणात केला होता. याचबरोबरीने काही ठिकाणी डॉल्बीचा दणदणाटही पाहायला मिळाला.

….त्याच उत्साहात निरोपाचा सोहळाही रंगला

बाप्पाला निरोप देताना साऱयांचीच अंतःकरणे जड झाली होती. मात्र, उत्सव काळात बाप्पांची मनोभावे आणि भक्तिभावे पूजा-अर्चा केल्याचे समाधान प्रत्येकाच्याच चेहऱयावर दिसत होते. यामुळेच ज्या उत्साहात गणेश चतुर्थीला वाजत गाजत गणरायांचे आगमन झाले, त्याच उत्साहात निरोपाचा सोहळाही रंगला होता. 

निरोप मिरवणुकीच्या सुरुवातीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 2 पासूनच मिरवणुकीच्या मार्गावरील रहदारी हटविण्याबरोबरच मार्ग खुले करण्यावर प्रशासनाने भर दिला होता. मिरवणुकीस प्रारंभ होताच वेगवेगळय़ा भागातून आलेले भाविक दाखल होत होते. बाप्पा मोरयाच्या गजरात आपल्या लाडक्मया बाप्पांचा जयघोष करीत भाविकांनी विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला.

माझ्या जीवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे

तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर राहू दे

सर्वांनाच सुखात, आनंदात, समाधानात ठेव! अशी प्रार्थना करीत बाप्पाला निरोप देण्यात आला.