|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तब्बल चार वर्षानंतर लागली शांत झोप!

तब्बल चार वर्षानंतर लागली शांत झोप! 

सुवर्णकन्या राही सरनोबत

आता लक्ष्य ऑलिम्पिक गोल्ड मेडल

पुणे येथे ‘तरूण भारत’ शी साधला मुक्त संवाद

जान्हवी पाटील /रत्नागिरी

नेमबाजीमधील सुवर्णपदक मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून कठोर मेहनत घेत होते. गोल्ड मेडलचे ध्येय गाठण्याच्या ध्येयाने आपल्याला इतके पछाडले होते की चार वर्षांत याच विचाराने कधीही शांत झोप लागली नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णवेध घेताच माझ्या मेहनतीचे चीज झाले आणि त्या रात्री मी शांतपणे झोपी गेले. आता टोकियो ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडल मिळविणे हे आपले टार्गेट असल्याचे अर्जुन पुरस्कार विजेती भारतीय नेमबाज व कोल्हापुरची सुवर्णकन्या राही सरनोबत हिने ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

रयत शांतिदूत, शांतिदूत प्रोडक्शन, युनिव्हर्स ऍकॅडमी, डिस्ट्रिक्ट स्पोर्टस ऑफीस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पुणे येथील बालगंधर्व रंगमंच येथे अर्जुन पुरस्कार जाहीर झालेली राही सरनोबत हिचा नागरी सत्कार पार पडला. यावेळी पुण्याचे महापौर मुक्ता टिळक, नेमबाज शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली भागवत, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, जिल्हा क्रीडा मोहन राठोड, अधिकारी विजय संतान, राहीचे आईवडिल, तरूण भारत रत्नागिरी प्रतिनिधी जान्हवी पाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर राही सरनोबत हीने गोल्ड मेडलपर्यंतचा आपला प्रवास ‘तरूण भारत’शी बोलताना मांडला. तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ नेमबाजीपासून वंचीत राहील्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे हा खडतर प्रवास तिने कथन केला. हाताच्या दुखापतीमुळे 2016 च्या रिओ ऑल्मिपिकची पात्रतादेखील राहीला गाठता आली नव्हती. दुखापतीमुळे खेळता येणार नसल्याचे समजताच आपण पार खचून गेले होते. तब्बल दिड वर्ष नेमबाजीपासून लांब रहावे लागले. 2017 च्या सरत्या वर्षात जर्मनीच्या विश्वविजेत्या नेमबाज मुन्खबयार दोरसुरेन यांना वैयक्तीक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करत जोरदार सराव सुरू केला. तरीदेखील दीड वर्षे खंड पडल्याने आपण कमी पडू अशी भीती मनात डोकावत होती. मात्र आपण प्रामाणिक प्रयत्न सुरूच ठेवल्याचे राही सांगते.

शेवटचे मिनीट महत्वाचे

आशियाई क्रीडा स्पर्धेचा शेवटचे मिनिट माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. या एका मिनिटाच्या कालावधीत मागील चार वर्षांचा खडतर प्रवास व घेतलेली मेहनत आठवली आणि पुन्हा एकदा मन खंबीर करत ध्येयावर लक्ष केदीत केले. आपण गोल्ड मेडल मिळवले असल्याचे लक्षात येताच एक आत्मिक समाधान लाभले.

स्वप्न पाहणे आवश्यक

कोणत्याही खेळाडूसाठी संयम महत्वाचा आहे. संयमामुळे कष्टाला योग्य फळ मिळते असे राही सांगते. प्रत्येक व्यक्तींनी स्वप्ने बघितली पाहिजे या स्वप्नांमुळे आपल्याला प्रोत्साहन मिळते, परिश्रम करण्याची इच्छाशक्ती वाढते त्यामुळे स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा असे राहीने सांगितले.

अंजली भागवत आदर्श

नेमबाज अंजली भागवत यांना मी माझा आदर्श मानते. त्यांच्याकडून अनेक चांगल्या गोष्टी आपण शिकलो. यावेळी यशासाठी आईवडिलांचे पाठबळही तितकेच महत्वपूर्ण ठरल्याचे तिने सांगितले.

अंजलीकडून कौतुक

नेमबाजमधील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली भागवत यांनी घालून दिलेल्या पायाला कळसापर्यंत न्यायचे कार्य राही सरनोबत हिने केले. राष्ट्रकुलमध्ये 2 सुवर्ण, आशियाईत एक सुवर्ण, एक कास्य आणि विश्व नेमबाजीत एक सुवर्ण, एक कास्य अशी चढत्या क्रमाने पदकाची कमाई राहीने केली आहे. राहीच्या नागरी सत्कार समारंभाला अंजली भागवत या आवर्जुन उपस्थित होत्या. त्यांनी राहीने घेतलेल्या कष्टाविषयी तिच्या जिद्दीची कहाणी पुणेकरांसमोर मांडली.