|Friday, September 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » किम यांच्याशी चर्चेस अबे तयार

किम यांच्याशी चर्चेस अबे तयार 

न्यूयॉर्क 

 अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यानंतर जपान देखील शांततेच्या मार्गावर वाटचाल करू पाहणाऱया उत्तर कोरियासोबतचे संबंध दृढ करू इच्छितो. याच प्रयत्नांतर्गत जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी उत्तर कोरिया विषयक स्वतःच्या कठोर भूमिकेत बदल करत किम जोंग उन यांच्या भेटीची इच्छा दर्शविली आहे. जपानी नागरिकांच्या अपहरणाबद्दल उत्तर कोरियासोबत सुरू असलेला दशकांपासूनचा वाद सोडवू इच्छित असल्याचे अबे यांनी सांगितले. उत्तर कोरियासोबत नव्या प्रारंभासाठी मी परस्परांमधील अविश्वास दूर करण्यास तयार आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची माझी इच्छा असल्याचे अबे यांनी म्हटले. परंतु त्यांनी उत्तर कोरियासोबत द्विपक्षीय चर्चेबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे.

जपान-उत्तर कोरिया वाद

मागील शतकाच्या 7 व्या आणि 8 व्या दशकात स्वतःच्या गोपनीय प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 13 जपानी नागरिकांचे अपहरण केल्याचे उत्तर कोरियाने मान्य केले होते. यातील 5 जण पुढील काळात जपानला परतले होते. तर जपानने स्वतःच्या 17 नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा केला होता. या अपहरण प्रकरणावरूनच दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू आहे.