|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यटनाच्या सर्वसमावेशक विकासासाठी गोव्याला पुरस्कार

पर्यटनाच्या सर्वसमावेशक विकासासाठी गोव्याला पुरस्कार 

पणजी :

नवी दिल्लीत गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार सोहळ्यात गोव्याने आणखी एक महत्वाचा टप्पा सर केला असून राज्याला 2016-17 साठीचा पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास (उर्वरित भारत) हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फान्स कनंथानम यांच्याहस्ते प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यंनी जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांच्यासोबत रश्मी वर्मा (आयएएस) पर्यटन सचिव, भारत सरकार यांच्या सन्माननिय उपस्थितीत स्वीकारला.

यंदा सलग दुसऱया वर्षी गोव्याने प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार स्वीकारला आहे. त्याचबरोबर गोव्याने पर्यटनाचा सर्वसमावेशक विकास (उर्वरित भारत) विभागात पुरस्कार मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.

गुरुवारी जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला. 1990 मध्ये एनटीए पुरस्कारांची स्थापना करण्यात आली होती आणि तेव्हापासून राज्य सरकार/ युटी आणि इतर पर्यटन मंडळांना पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीसाठी व त्यांच्यात निकोप स्पर्धा रहावी यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात.

गेल्या सहा वर्षात गोवा राज्याने केलेल्या उल्लेखनिय कामगिरीचा संपूर्ण तपशील दाखल केल्यानतंर या पुरस्कारासाठी गोव्याची निवड झाली असून मुलभूत सुविधांचा विकास, पर्यटन प्रकल्पांचा प्रारंभ, पर्यटन उत्पादने व सेवांचे लाँच, सुरक्षिततेसाठी हाती घेतलेले उपक्रम, स्वच्छता, धोरण, विपणन आणि प्रचार, कार्यक्रम या विभागांत केलेल्या कामगिरीचा त्यात समावेश आहे.