|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुखी जीवनासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक

सुखी जीवनासाठी विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक 

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

गरीबी, निरक्षरता, रोग, शेतकऱयांचे प्रश्न, भ्रष्टाचार, हवामान बदल आणि महिलांवरील अत्त्याचार ही आपल्यासमोरील मोठी आव्हाने आहेत. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि तो जात, धर्म किंवा स्त्री- पुरुषांपुरता मर्यादित नाही. लोकांनी खासकरुन अभियांत्रिकी क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन देश सुरक्षित, स्थीर आणि निरोगी करण्याच्या कामात सहभागी व्हायला पाहिजे. माणसाचे जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केले.

 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) चौथ्या पदवीदान सोहळ्य़ात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. हा कार्यक्रम काल शुक्रवारी कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

 विद्यार्थ्यांसाठी पाच सूत्रे महत्वाची

 आपले पालक, राष्ट्र, मूळ गाव, भाषा आणि गुरु या पाच गोष्टी विद्यार्थ्यांनी नेहमीच लक्षात ठेवाव्या. या पाच गोष्टी विद्यार्थ्यांना एक नम्र आणि आदर्श व्यक्तिमत्त्व बनवेल, असेही प्रतिपादन उपराष्ट्रपतीनी केले.

 मुख्यमंत्री पर्रीकर यांना डॉक्टर ऑफ इंजिनियरिंग पदवी

 पदवीदान समारंभात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा या विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या. एनआयटी गोवातर्फे वेंकय्या नायडू यांच्या हस्ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डॉक्टर ऑफ इंजिनियरिंग ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पर्रीकर यांच्यावतीने एनआयटीचे संचालक प्रा. गोपाळ मुगूराई यांनी ही पदवी स्वीकारली.

पदवीदान… परिपूर्ण भविष्याची सुरुवात

पदवीदान सोहळा हा केवळ औपचारिक प्रसंग नसून एक महत्त्वाची गोष्ट आहे. जी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशा आणि नवीन अध्यायाची सुरुवात करते. त्याचप्रमाणे पुढील आयुष्यात उज्ज्वल भविष्य, स्वप्ने, अपेक्षा परिपूर्ण भविष्याची सुरुवात करणारा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे उपराष्ट्रपती पुढे बोलताना म्हणाले.

ग्ााsवा अन् देशासाठी सध्या सकारात्मक चित्र

एनआयटीच्या सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पाचपैकी तीन विद्यार्थी गोव्यातील रहिवासी आहेत, याबद्दल आनंद व्यक्त केला. ही तीन सुवर्ण पदके राज्यातील युवकांमधील असलेली कुशलता दर्शविते. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये 70 टक्के मुली आहेत हे पाहूनही त्यांनी आनंद व्यक्त केला आणि ही गोष्ट आपल्या देशासाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

शिक्षण हा जीवनातील एक न संपणारा प्रवास

शिक्षण हा जीवनातील एक न संपणारा प्रवास आहे. विद्यार्थ्यांनी उच्च उद्दिष्टे बाळगून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. लक्ष्य आणि स्वप्ने न पाहण्याने केवळ त्रास होईल. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाने वाटचल करणाऱयांची स्वप्ने पूर्ण होतात. उच्च तत्वे आणि मुल्यांशी पूर्णतः कटिबद्ध राहिले पाहिजे. आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहिल्यास तुमचे जीवन नक्की यशस्वी होईल, असे नायडू म्हणाले.

भारताची आज आर्थिक दृष्टय़ा जलद प्रगती

भारत आज आर्थिक दृष्टय़ा जलद प्रगती करीत आहे. पुढील आर्थिक वर्षातील जीडीपी वाढ 7.3 टक्के एवढी अपेक्षित आहे. व्यवसायिकदृष्टय़ा भारत देश आज आकर्षणाचे केंद्र आहे. व्यवसाय करण्यासाठी अन्य देश भारताकडे आकर्षित होत आहेत. 2018-19 या आर्थिक वर्षात गुंतवणूक वाढ 8.8 टक्क्यापर्यंत जाणार आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड व एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या अहवालानुसार भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक सत्ता असेल.

भारतीय संस्कृती व ज्ञान जगाला आदर्शवत

भारतीय संस्कृती आणि ज्ञानाचा संपूर्ण जग आदर करते. आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम’वर विश्वास ठेवतो. वाटा आणि काळजी घ्या हा भारतीय तत्वज्ञानाचा मूळ गाभा असून आपली क्षमता समजून घेणे आणि कौशल्य सुधारणे आवश्यक आहे. 2030 पर्यंत भारत जगातील उच्च, मध्यम उत्पन्न मिळविणारा प्रमुख देश बनेल आणि विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित कुशल तरुणांसाठी विविध संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षकांनी स्वयंरोजगार मिळविण्यास सक्षम होण्यासाठी तरुणांना कुशल बनविले पाहिजे. सरकारचा ‘कुशल भारत’ कार्यक्रम हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात प्रत्येकाकडे विद्वत्ता असून ती विकसित व्हावी

या देशात प्रत्येकाकडे विद्वत्ता आहे. कलागुणांना प्रोत्साहन मिळायला हवे. प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही. स्वयंरोजगारावरही भर देणे आवश्यक आहे. भारतीय जेवण व खाद्यपदार्थांना मागणी आहे. गोव्याची ‘फिशकरी’ तर सर्वांचीच आवडती आहे. तिला कुठेच पर्याय नाही. भारत देश हा शिक्षणातील गुरु आहे. नालंदा, तक्षशीला विद्यापीठामध्ये विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी यायचे. त्यामुळे आमची क्षमता आपण समजून घ्यायला हवी. विद्वत्ता विकसित व्हायला हवी. देशातील 65 टक्के नागरिक 30 ते 35 वयोगटातील आहेत. त्यामुळे तरुणांना आज मोठय़ा संधी उपलब्ध आहेत व आव्हानेही आहेत, असे ते म्हणाले.

शिक्षण पद्धत ही देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. विकासाच्या विरुद्ध येणारे अडथळे आम्ही दूर केले पाहिजेत. देशाच्या पुढील विकासासाठी युवा अभियंत्यानी मौल्यवान योगदान दिले पाहिजे. उच्च शिक्षण क्षेत्रात आवश्यक त्या साधन सुविधा निर्माण करुन उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. उद्योगात मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धतीत बदल केले पाहिजे. विविध आव्हानांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक आणि अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे नायडू म्हणाले.

संस्थेबाहेरील जग हे खूप मोठे आहे. समाजाप्रती तुमचे जे कर्तव्य आहे ते तुम्ही विसरता कामा नये. तुम्ही तुमच्या अभियांत्रिकी व्यवसायातून तत्वांचे पालन केले पाहिजे. पर्यावरणाचे संरक्षण हा आपल्या समोरील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जीवन सुखी बनविण्यासाठी आपल्या नैसर्गिक संस्कृतीचे संरक्षण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना समाज, पालक, नोकरी आणि निसर्गाप्रती प्रामाणिक राहाण्यास सांगितले. तसेच समाजातील वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी  कार्य करण्याचे आवाहन केले.

सुरुवातीला एनआयटीचे संचालक प्रा. गोपाल मुगूराई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते पाच पीएचडी, 46 एम.टेक आणि 86 बी.टेक पदव्या प्रदान केल्या. तसेच एनआयटीच्या शिक्षकांचा सत्कार केला. निबंधक श्री. वसंत यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची शपथ दिली. शंकरप्रसाद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वसंत यांनी आभार मानले.