|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News »  माझी प्रत्येक कविता ही एक राजकीय विधानच असते : मसापच्या प्रकट मुलाखतीत कवी अजय कांडर यांचे मत

 माझी प्रत्येक कविता ही एक राजकीय विधानच असते : मसापच्या प्रकट मुलाखतीत कवी अजय कांडर यांचे मत 

पुणे / प्रतिनिधी :

तुमच्या जगण्याला राजकारण जन्मतःच चिकटून आलेले असते. निवडणुकीच्या राजकारणापलीकडे राजकारणाची व्यापकता खूप सूक्ष्म पातळीवर समजून घ्यायला हवी. नित्याचे जगणे आणि त्या जगण्यातील हस्तक्षेप व्यवहार हा एक राजकारणाचाच भाग असतो. कवीची अशी समज वाढत जाते, तेव्हा तो भवतालाकडे सतत नेणीवेच्या पातळीवर समजून घेत असतो. यातून व्यक्तिगत आयुष्याच्या पलीकडे समजून घेऊन तो आपल्या कवितेतूनही राजकीय हस्तक्षेपच करत असतो. माझी प्रत्येक कविता ही एक राजकीय विधानच असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी मसाप पुणेतर्फे येथे आयोजित करण्यात आलेल्या आपल्या प्रकट मुलाखतीत केले.

मसापच्या पटवर्धन सभागृहात ‘एक कवी एक कवयित्री’ या कार्यक्रमात कांडर यांच्यासोबतच जेष्ठ समीक्षक, कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांनी कवी स्वतः समीक्षक असेल, तर त्याची समिक्षादृष्टी त्याच्या कवितेला एक दिशा देण्याची शक्यता राहते, यासाठी त्या कवीने आपल्या कवितेकडे पुन्हा पुन्हा नम्रतेने पहायला हवे, असे आग्रही प्रतिपादन केले. नाटक, चित्रपट, सामाजिक अशा विविध स्तरातील बहुसंख्य रसिकांचा प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात कांडर यांच्याशी ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, तर डॉ. गुंडी यांच्याशी ऍड. प्रमोद आडकर यांनी संवाद साधला. सुमारे दोन तास चाललेल्या या मुलाखतीदरम्यान कांडर यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अंगाने आपली मते स्पष्टपणे मांडली. तर डॉ. गुंडी यांनी आपल्या वक्तव्यातून बाईच्या जगण्याची सनातन वेदना आणि आपली समीक्षादृष्टी याबाबत स्पष्टपणे मते व्यक्त केली. या वेळी मसापच्या कार्याध्यक्षा सुनीताराजे पवार, ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे, ज्येष्ठ लेखिका मंदा खांडगे, अनुवादक सुनीता डागा, कादंबरीकार सुशील धसकटे, प्रतीक पुरी, ज्येष्ठ कवी मनोहर सोनवणे, कवी सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, डॉ. संगीता बर्वे आदी उपस्थित होते.

कांडर म्हणाले, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जगणं बदलत असतं याचा अर्थ जगणं तुमचं एक रेषीय नसेल, तर कविता एक रेषीय कशी काय लिहिता येईल? इतरांचा मेंदू ताब्यात ठेवू पहाणारा वर्ग नेहमीच परंपरेचे जोखड अधिक मजबूत करू पहात असतो. अशावेळी परंपरेच्या आहारी गेलेला समाज आपली विवेकबुद्धी हरवून बसण्याची शक्यता रहाते. ही अविवेकी परंपरा चुकीच्या धर्मसंस्कारातून येते. तशी ती अधर्म संस्कार इतरांच्या मेंदूवर बिंबवू पहाणाऱया आणि आपले वर्चस्व दर पिढीत पुनर्जिवीत करू पहाणाऱया व्यक्तीच्या कटकारस्थानी वृत्तीतून अधिक घट्ट होत जाते. अशावेळी परंपरेतील जे चांगलं ते स्वीकारायला हवे. पण कवीने, तर परंपराच उलटी तपासून पहायला पाहिजे. कवितेतील कवितापण हरवू नये, असे झाले तर कवीची लिहिण्यामागची भूमिका चिंतनशील पातळीवरून अभिजात साहित्य वाचणाऱया वाचकांपर्यंत पोहोचणार नाही, हेही कवीने लक्षात घ्यायला हवे. मंचावर प्रतिसाद मिळणाऱया सगळ्याच कवितेला मंचीय कविता म्हणता येत नाही. तसं म्हटलं तर पठ्ठेबापूराव, शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे ते आजच्या संभाजी भगत अशा सगळ्याच परंपरेला निकालात काढावे लागेल. मात्र, इतरांच्या कवितेला प्रतिसाद मिळतो हे पाहून तशी कविता गाण्याची नक्कल करणे, त्याच मानसिकतेत पुढील कविता लिहिणे आणि तशी कविता सादर करणे, अशा कवींपासून नव्याने लिहिणाऱया कवींनी दूर रहायला हवे.

डॉ. गुंडी म्हणाल्या, ‘मी आठवीत असल्यापासून कविता लिहायला लागले आणि वडिलांमुळे माझी कविताही त्याचवेळेपासून प्रसिद्ध व्हायला लागली. मात्र, पुढे खूप वाचन झाल्यानंतर नेमकं काय लिहायला पाहिजे आणि काय नको याचे भान येत गेले. माझ्या पीएचडीच्या संशोधनातूनही मी कवितेकडे गांभिर्याने बघू लागले. माझ्या समीक्षकदृष्टीतून कवितेची दृष्टी विकसित होत गेली. चांगल्या कवितेसाठी चांगली चिंतनशीलता महत्त्वाची असते. यामुळे आपल्यातील कवितेची समज वाढत जाऊन इतरांचेही कविता लेखन समजून घेण्याचे आकलन वाढत जाते. आपल्यातील आकलन क्षमता गमावली, तर चांगली कविता लिहिण्याची शक्यता कमीच रहाते. मुलाखतीच्या प्रारंभी आणि शेवटच्या भागात कांडर, डॉ. गुंडी यांनी आपल्या कवितांचे वाचन केले.