|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » शिक्षण, नवोन्मेष देशासाठी आवश्यक

शिक्षण, नवोन्मेष देशासाठी आवश्यक 

शिक्षण परिषदेत पंतप्रधान नरेंद मोदींचे प्रतिपादन : शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देण्याचे धोरण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका परिषदेदरम्यान शिक्षणाला समाजाशी जोडण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. ज्ञान आणि शिक्षण केवळ पुस्तकी असू शकत नसल्याने शिक्षणाला लक्ष्य देणे आणि त्याला समाजाला जोडण्याची गरज आहे. शिक्षण आणि नवोन्मेष देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सरकारने आयआयएम सारख्या संस्थांना स्वायत्तता देण्यास प्रारंभ केला असून आता आयआयएमला स्वतःचा अभ्यासक्रम, प्राध्यापक नियुक्ती, संचालक मंडळ नियुक्ती, विस्तार इत्यादी निर्णय घेण्याचे अधिकार मिळाल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.

विज्ञान भवनात आयोजित शिक्षण विषयक परिषदेला संबोधित करताना सरकारची आता यात कोणतीही प्रशासकीय भूमिका नसेल आणि हा निर्णय अभूतपूर्व असल्याचा दावा केला. देशात सध्या सुमारे 900 विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्था आहेत, त्याचबरोबर सुमारे 40 हजार महाविद्यालये आहेत. समाजाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी उच्च ध्येये बाळगल्यास मोठा बदल घडू शकत असल्याचे मोदी म्हणाले.

नवोन्मेषावर भर

शिक्षणाचा उद्देश व्यक्तीच्या प्रत्येक पैलूचा संतुलित विकास करणे आहे आणि संतुलित विकास नवोन्मेषाशिवाय शक्य नाही. आमच्या प्राचीन तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला यासारख्या विद्यापीठांमध्ये देखील ज्ञानासोबत नवोन्मेषावर भर दिला जायचा. हाच दृष्टीकोन अंगिकारून आज सरकार शिक्षणाला लक्ष्य देणे, त्याला समाजाशी जोडणे आणि शिक्षणक्षेप्तातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मोदींनी सांगितले.

जागतिक नागरिक, जागतिक गाव

जगात आज कोणताही देश, समाज किंवा व्यक्ती रुढार्थाने वेगळा राहू शकत नाही हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागेल. ‘ग्लोबल सिटिजन आणि ग्लोबल व्हिलेज’च्या तत्वावर विचार करावाच लागेल आणि हेच तत्व आमच्या संस्कारांमध्ये प्राचीनकाळापासून असल्याचे मोदी म्हणाले.

उच्च आचार, विचार, संस्कार

आमचे शिक्षण आम्हाला उच्च विचार, उच्च आचार, उच्च संस्कार तसेच उच्च वर्तनासोबतच समाजाच्या समस्यांवर उत्तम तोडगा देखील उपलब्ध करते. विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विद्यापीठाच्या वर्गात ज्ञान देण्यासोबतच त्यांना देशाच्या आकांक्षांशी देखील जोडा अशी माझी विनंती आहे. आम्ही प्रत्येक स्तरावर देशाच्या आवश्यकतांमध्ये शैक्षणिक संस्थांना भागीदार करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोदींनी म्हटले.

शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक

 याच दृष्टीकोनांतर्गत अटल टिंकरिंग लॅबची सुरुवात करण्यात आली असून यात शालेय मुलांमध्ये नवोन्मेषाची वृत्ती वाढविण्यावर भर दिला जातोय. आमच्या शिक्षण जगतातील गुंतवणुकीवर देखील लक्ष दिले जातोय. शिक्षणाची सुविधा उत्तम व्हावी याकरता राईज (रीव्हायटलायझेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अँड सिस्टीम्स इन एज्युकेशन) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे 2022 पर्यंत 1 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य राखण्यात आले आहे. सरकारने हायर एज्युकेशन फंडिंग एजेन्सीची स्थापना केली असून याद्वारे शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेत आर्थिक मदत पुरविली जाणार आहे. सरकारने राष्ट्रीय उच्चशिक्षण मोहिमेचे अंदाजपत्रक वाढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

Related posts: