|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणच्या धर्तीवर लोकोत्सव

काणकोणच्या धर्तीवर लोकोत्सव 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोण तालुक्यात आदर्श युवा संघातर्फे ज्या पद्धतीने लोकोत्सव आयोजित करण्यात येतो त्याच धर्तीवरचा लोकोत्सव डिचोली तालुक्यात देखील व्हावा, अशी अपेक्षा डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी श्रीस्थळ-काणकोण येथे ‘लोकोत्सव 2019’च्या माहितीपुस्तिकेचे अनावरण केल्यानंतर बोलताना व्यक्त केली.

7 ते 9 डिसेंबर यादरम्यान आमोणे येथील आदर्श ग्रामात होणाऱया लोकोत्सव 2019 च्या माहितीपुस्तिकेच्या अनावरण समारंभाच्या व्यासपीठावर माजी मंत्री रमेश तवडकर, आयोजन समितीचे श्रीकांत तवडकर, बलराम उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कमलाकर म्हाळशी, बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, पंच प्रभाकर गावकर, रूपा गावकर, दत्ता वेळीप, प्रवासी गावकर, रेखा काणकोणकर, अशोक गावकर व जानू तवडकर उपस्थित होते. लोकोत्सव हा खऱया अर्थाने आज लोकांचा उत्सव झालेला असून त्याने गगनभरारी घेतलेली आहे, अशा शब्दांत सावळ यांनी कौतुक केले.

शिक्षण, आदिवासी समाजाला न्याय, कृषी क्षेत्राचा विकास, ग्रामीण संस्कृतीला चालना त्याचबरोबर ग्रामीण खाद्यसंस्कृती आणि औषध परंपरेला सरकारी मान्यता मिळावी या उद्देशाने 24 वर्षांपूर्वी आदर्श युवा संघाची स्थापना करण्यात आली आणि त्याच माध्यमातून लोकोत्सव सुरू करण्यात आला. आज त्याने भव्य असे स्वरूप घेतले आहे. लोकांचा जो भरभरून पाठिंबा मिळतो त्यातच या महोत्सवाचे यश लपले आहे, असे मत यावेळी रमेश तवडकर यानी व्यक्त केले.

या समारंभाला निशांत चणेकर, नरेश कडकडे आणि तालुक्यातील महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. यावेळी कमलाकर म्हाळशी यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर वेळीप यांनी केले. श्रीकांत तवडकर यांनी स्वगत केले, तर अशोक गावकर यांनी आभार मानले. वंदना वेळीप, सुनीती टेंग्से यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले.

Related posts: