|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गनगरीत महिलांचा मोर्चा

सिंधुदुर्गनगरीत महिलांचा मोर्चा 

स्वाभिमान पक्षाच्या महिला आघाडीचा ‘एल्गार’ : अत्याचारप्रकरणी लॉज मालकाच्या चौकशीची मागणी

प्रतिनिधी / ओरोस:

 सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद असताना जिल्हय़ात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर धाक राहिला नाही, असे आरोप करीत सावंतवाडी तालुक्यात नुकत्याच झालेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी संबंधित लॉज मालकावर गुन्हा दाखल करावा व संबंधित संशयित आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असा तपास केला जावा, या मागणीसाठी स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत जिल्हय़ातील कायदा, सुव्यवस्था व महिला सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली.

 अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निमित गोयल यांची भेट घेत शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन सादर केले. त्याचप्रमाणे सावंतवाडी प्रकरणातील पुरावे नष्ट होऊ नयेत, याची खबरदारी घेतली जावी, अशी मागणी करण्यात आली.

 कॉलेज मित्राबरोबर बोलताना बघून फेसबूक मित्राने घरी सांगण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीला मळगाव (ता. सावंतवाडी) येथील एका लॉजवर नेऊन गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला अन्य दोन मित्रांच्या स्वाधीन केले. त्यांनी रेल्वेस्थानक परिसरात अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिली असून संबंधित संशयित आरोपींना अटक होऊन न्यायालयीन बाबी सुरू आहेत.

दरम्यान या घटनेनंतरही वेंगुर्ले तालुक्यात आणखी एक घटना घडली आहे. जिल्हय़ात विविध ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. तसेच ज्या लॉजवर ही घटना घडली, त्या लॉज मालकाचीही चौकशी करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी जिल्हा महिला आघाडीप्रमुख प्रणिता पाताडे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी ओरोस फाटा ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. अनैतिक धंदेही वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

 पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडेच राज्याचे गृहराज्य मंत्रीपद आहे. मात्र असे असतानाही त्यांच्याच जिल्हय़ात हे प्रकार वाढीस लागताना दिसत आहेत. ही खेदाची बाब असल्याचे प्रणिता पाताडे यांनी सांगितले. पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नसल्याने व गुन्हेगारांनाही कडक शासन होण्याची भीती राहिली नसल्यानेच हे प्रकार वाढीस लागत असल्याचा आरोपही करण्यात आला.

 सिंधुदुर्ग जिल्हय़ाची संस्कृती आदर्शवत आहे. त्यामुळे अन्य ठिकाणांप्रमाणे सत्ता व पैसा इत्यादीच्या जोरावर दडपशाही केली गेल्यास जिल्हय़ातील महिला गप्प बसणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा मंत्रालयावरही मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला. मोठय़ा संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली. पुराव्याअभावी अनेक आरोपी मोकाट सुटतात. मात्र या प्रकरणातील आरोपी सुटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. रेल्वे पोलीस काय करीत होते? तसेच या लॉजवर अनेक धंदे चालतात, असे आरोप करीत या सर्व गोष्टींची चौकशी करून लॉज मालकावर कारवाई करावी व लॉज बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता जिल्हय़ाचा लौकिक जपावा. पीडित युवती तसेच जिल्हय़ातील माता भगिनींना सुरक्षिततेची खात्री द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान संबंधित लॉजचा परवाना कायमस्वरुपी रद्द व्हावा, याबाबतचा प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे गोयल यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

 स्वाभिमान महिला आघाडीप्रमुख प्रणिता पाताडे यांच्यासह जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, डॉ. पूजा कर्पे, सुमेधा पाताडे, मेघा गांगण, संध्या तेरसे, संजना सावंत, स्वाती राणे, प्राची तावडे, सारिका काळसेकर, प्रज्ञा परब, शारदा कांबळे, सायली सावंत, दीप्ती पडते, कल्पिता मुंज, जि. प., पं. स. सदस्या आदींसह महिला मोठय़ा संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Related posts: