|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नवरात्रोत्सवात मंत्र्यांना मिळणार अतिरिक्त खाती

नवरात्रोत्सवात मंत्र्यांना मिळणार अतिरिक्त खाती 

 

प्रतिनिधी/पणजी

कृषीमंत्री आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी काल सोमवारी अचानक दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन सुमारे दोन तास चर्चा केली. मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांचे वाटप करण्याअगोदर मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांबरोबर नवी दिल्लीत चर्चा करणार आहेत. तसेच पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे ऐन नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्लीत एम्स इस्पितळात होईल, असा अंदाज आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सध्या जैसे थे आहे. थोडाफार अशक्तपणा जाणवत असला तरीही त्यांचे विशेष सचिव पी. कृष्णमूर्ती यांच्याबरोबर बसून अनेक फाईल्स हातावेगळ्य़ा करण्याचे काम ते दिल्लीच्या एम्स् इस्पितळातून करीत आहेत. सोमवारी सरदेसाई आणि या पक्षाचे नेते सूरज लोटलीकर यांनी एम्स इस्पितळात जाऊन त्यांच्याबरोबर सुमारे दोन तास चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. पितृपंधरवडा झाल्यानंतर साधारणतः दि. 11 ऑक्टोबर रोजी काही प्रमुख मंत्र्यांना मुख्यमंत्री नवी दिल्लीत एम्स इस्पितळात बोलावून घेतील. तिथेच बैठक होईल. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते रामलाल वगैरेंनाही बोलावून घेतले जाईल. त्यानंतरच मुख्यमंत्री आपल्याकडील जादा खात्यांचे वाटप इतर मंत्र्यांना करतील.

आणखी एक महिना इस्पितळात?

मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, आता लवकरच आणखी एक केमो होईल. त्यानंतर आणखी तीन आठवडे म्हणजे जवळपास एका महिन्यानंतर आपण गोव्यात परतणार आहे. त्यानंतर जी काही कामे प्रलंबित आहेत ती सर्व पार पाडली जातील.

यावेळी विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लवकर बरे होऊन गोव्यात या, अशा शुभेच्छा दिल्या.

मासळीची आयात बंद करण्याची मागणी

गोव्यात आयात केल्या जाणाऱया मासळीवर बंदी घालण्याची मागणीही विजय सरदेसाई यांनी केली. बाहेरच्या राज्यातून येणाऱया मासळीमध्ये फॉर्मेलिन वापरले जात असल्याच्या तक्रारी व आरोप होत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून मासळी आयात करणेच बंद करावे, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली.