|Friday, December 13, 2019
You are here: Home » Top News » शेतकऱयांवर कारवाई होते, मग सनातन्यांवर का नाही?; मोदींविरोधात ओवेसी-आंबेडकरांचा एल्गार

शेतकऱयांवर कारवाई होते, मग सनातन्यांवर का नाही?; मोदींविरोधात ओवेसी-आंबेडकरांचा एल्गार 

औरंगाबाद / प्रतिनिधी :

देशाला राज्यघटना संघ, भाजपने तसेच काँग्रेसने नव्हे; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. सत्ताधारी संविधान बचाव रॅली काढून केवळ देखावा निर्माण करत आहे. मात्र, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजले नाहीत, ते काय संविधानाचे रक्षण करतील. त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा टोला एमआयएमचे प्रमुख ऍड. असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी भाजपाला लगावला. तर भाजपाच्या राज्यात शेतकऱयांवर कारवाई होते, मग सनातन्यांवर का होत नाही, अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाला फटकारले.

आगामी निवडणुकीत एमआयएम व भारिप बहुजन महासंघाने हातमिळवणीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांचे प्रमुख ऍड. असदुद्दीन ओवेसी व ऍड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यातील पहिली संयुक्त सभा मंगळवारी औरंगाबादेतील जबिंदा लॉन्सवर झाली. त्या वेळी दोघांनी मोदींच्या कारभारावर जोरदार टीका केली. मोदी सरकारमुळे वंचित, दलित आणि बहुजन पीडित आहेत. भाजपच्या काळात वंचित, बहुजनांवर सर्वात जास्त अन्याय झाला आहे. अन्याय संपविण्यासाठी आपण सगळय़ांनी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आता वंचित, बहुजन दलितांचे एकीचे बळ दिसेल, असे ओवेसींनी सांगितले.

दलाली खाण्यासाठी इंधनदरात वाढ आंबेडकरांचा आरोप

आंबेडकर म्हणाले, भाजपाच्या राज्यात शेतकऱयांवर, नक्षलवाद्यांवर कारवाई होते. मग, सनातन्यांवर कारवाई का होत नाही? सर्वांना एकच न्याय मिळाला पाहिजे. मात्र, त्याबाबत दुटप्पी धोरण अवलंबले जात आहे. दलाली खाण्यासाठी पेट्रोलचे दर वाढविले जात आहेत. सरकारने किरकोळ व्यापाऱयांचा घासही हिरावला आहे. मोदी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहोत. राजेशाहीला लोकशाहीत जागा नाही. त्यामुळे आपली ही ताकद आता मतपेटीत उतरली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

Related posts: