|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » साईचरणी पंतप्रधान मोदी हजेरी लावणार; समाधी शताब्दी सोहळय़ाच्या समारोपास 19 ऑक्टोबरला शिर्डीत

साईचरणी पंतप्रधान मोदी हजेरी लावणार; समाधी शताब्दी सोहळय़ाच्या समारोपास 19 ऑक्टोबरला शिर्डीत 

शिर्डी / प्रतिनिधी :

साईबाबा समाधी शताब्दी सोहळय़ाची ऐतिहासिक सांगता येत्या 19 ऑक्टोबरला होत असून, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. शहराच्या नियोजित विकास आराखडय़ातील कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.                                                      

साईबाबा संस्थानच्या वतीने 1 ऑक्टोबर 2017 ते 19 ऑक्टोबर 2018 या कालावधीत साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या शताब्दी वर्षाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हस्ते झाली. तर सांगता समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी दुपारी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा संस्थानच्या सभागृहात नियोजन बैठक पार पडली. साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल व अन्य मान्यवर उपस्थित होते.

याबाबत शिंदे म्हणाले, सांगता सोहळय़ाची जय्यत तयारी सुरू आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या पंतप्रधान आवास योजनेची सुमारे 2 लाख 44 हजार घरकुले पूर्ण झाली असून त्या लाभार्थ्यांना घरकुले देण्यासाठी या कार्यक्रमात समाविष्ट केले आहे. त्याचबरोबर साईबाबा संस्थानच्या अत्याधुनिक दर्शन रांग आणि विविध कामांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यपाल सी. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित असतील.

15 लाख भाविक येणार असल्याचा दावा

18 ते 20 ऑक्टोबर या तीन दिवसांत देशभरातून सुमारे 15 लाख भाविक येतील, असा दावाही त्यांनी केला. या सर्वांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सर्व विभागांवर जबाबदारी देण्यात आली आहे. 18 ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर रात्रभर उघडे राहणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. साईबाबांच्या समाधीला या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, शहराची क्षमता इतके भाविक सामावून घेण्याची आहे का, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण होत आहे.