|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » कोलकात्यात स्फोट, मुलाचा मृत्यू

कोलकात्यात स्फोट, मुलाचा मृत्यू 

10 जण जखमी : स्फोटानंतर राजकारण तापले, तपासापूर्वीच तृणमूलचा राजकीय आरोप

  वृत्तसंस्था/ कोलकाता 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील दमदम बाजार परिसरातील एका बहुमजली इमारतीसमोर मंगळवारी झालेल्या स्फोटात एका बालकाला जीव गमवावा लागला आहे. तसेच या घटनेत 10 जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटानंतर राज्यातील राजकारण गतिमान झाले आहे. तृणमूल काँग्रेसने या स्फोटामागे भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला. तर तृणमूलने स्फोटाचा वापर राजकारणासाठी चालविल्याचा प्रतिआरोप करत भाजपने एनआयए चौकशीची मागणी केली आहे.

दमदम येथील दुकानाच्या बाहेर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा उच्च तीव्रतेचा स्फोट होता, यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट कशाने घडविण्यात आला याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही असे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

स्फोटामागे भाजपः तृणमूल

स्थानिक आमदार पूर्णेंदू बोस यांनी या स्फोटामागे भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केला आहे. ही दुर्घटना नसून कटांतर्गत करण्यात आलेला हल्ला आहे. तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा हा कट होता. एखाद्या गुप्त संघटनेचे हे कृत्य आहे. विधानसभा आणि पालिका निवडणुकीत तृणमूलच्या चांगल्या कामगिरीमुळे हताश होत हा हल्ला करण्यात आल्याचा दावाही बोस यांनी केला.

तृणमूलकडून स्फोटाचे राजकारण

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते बाबूल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेस या स्फोटाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. या स्फोटाचे खापर भाजपवर फोडण्याचा डाव तृणमूलनेच रचला असून भाजपवर यापूर्वी देखील असे आरोप झाले, परंतु त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचा दावा सुप्रियो यांनी केला.

मला लक्ष्य करून स्फोट

स्फोट झालेल्या परिसरातील इमारतीत दक्षिण दमदम नगर पालिकेचे अध्यक्ष पंचू रॉय यांचे कार्यालय देखील आहे. हा स्फोट आपल्याला लक्ष्य करून करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी संबंधित लोकांवर हल्ले करणाऱया पक्षाचाच यामागे हात असल्याचा आरोप रॉय यांनी केला आहे.

Related posts: