|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नारिंग्रेत एसटी अपघातानंतर वाहतूक ठप्प

नारिंग्रेत एसटी अपघातानंतर वाहतूक ठप्प 

रुग्णवाहिकाही अडकली : ‘स्वाभिमान’कडून चालक धारेवर : दोन तासानंतर वाहतूक सुरळीत

वार्ताहर / देवगड:

देवगड-आचरा मार्गावरील नारिंग्रे येथील धोकादायक चढउताराच्या वळणावर मंगळवारी दुपारी 3.30 वा. च्या सुमारास दोन एसटींची समोरासमोर धडक बसली. अपघातात कुणालाही दुखापत झालेली नसली तरी अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. एसटी गाडय़ा बाजूला करण्यास दोन्ही वाहकांनी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्याने तेथे स्वाभिमानचे वैभव वारिक, विलास वारिक, मंगेश बाणे यांच्यासह एसटीतील प्रवाशांनीही तीव्र संताप व्यक्त करीत एसटी चालक, वाहकांना धारेवर धरले.

दरम्यान, देवगड सायंकाळी 5.30 वा. एसटी वाहतूक नियंत्रकांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त एसटी गाडय़ा बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. देवगड एसटी स्थानकातून दुपारी 3.40 वा. विजयदुर्ग- मालवण ही बसफेरी सुटली होती. ही बसफेरी नारिंग्रे येथील धोकादायक चढउताराच्या वळणावर आली असता समोरून आलेल्या आचरा-देवगड बसफेरीची विजयदुर्ग-मालवण बसफेरीला धडक बसली. अपघातात एसटींचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. नारिंग्रे रस्ता अरुंद असल्याने अपघातग्रस्त एसटींमुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली.

रुग्णवाहिका अडकली

यावेळी आचऱयाहून देवगडकडे रुग्ण घेऊन जाणारी रुग्णवाहिकाही वाहतुकीच्या खोळंब्यात अडकून पडली. स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतील रुग्णाला दुसऱया बाजूच्या खासगी वाहनाने रुग्णालयात हलविले. तसेच देवगडहून मालवणकडे खासगी वाहनातून रुग्णाला घेऊन जाणाऱया मुंबईकर चाकरमान्यांनाही मुणगे येथून पर्यायी मार्ग पत्करावा लागला. एसटीचा किरकोळ अपघात असतानाही चालकांनी एसटी गाडय़ा बाजूला हटविण्यास वेळकाढूपणाचे धोरण घेतल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

स्वाभिमानकडून चालक, वाहक धारेवर

याचदरम्यान, या मार्गावर प्रवास करणारे पडेल कॅन्टीग येथील स्वाभिमानचे कार्यकर्ते वैभव वारिक, विलास वारिक, मंगेश बाणे, मयेकर यांनी एसटी चालक, वाहकांशी चर्चा केली. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही समर्पक उत्तरे न मिळाल्याने प्रवाशांसह स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनीही चालक, वाहकांना धारेवर धरले. अखेर, देवगड एसटी वाहतूक नियंत्रक गोरे यांनी सायंकाळी 5.30 वा. अपघातस्थळी जात पंचनामा करून एसटी गाडय़ा रस्त्यावरून बाजूला करण्याच्या सूचना चालकांना दिल्या. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.