|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अणाव-हुमरमळय़ात चोरटय़ांचा धुडगुस

अणाव-हुमरमळय़ात चोरटय़ांचा धुडगुस 

दोन मंदिरांसह बंगला फोडला : मंदिरातील फंडपेटी गायब : मठातील फंडपेटी फोडून रक्कम लंपास

वार्ताहर / पणदूर:

एकीकडे पोलीस चोरटय़ांना जेरबंद करीत असताना दुसरीकडे चोऱयांची मालिका मात्र सुरूच राहिली आहे. कुडाळ तालुक्यातील अणाव-हुमरमळा परिसरात मंगळवारी रात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घालत अणाव स्वयंभू रामेश्वर मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरातील फंडपेटय़ा फोडल्या. हुमरमळा येथील बंद बंगलाही फोडला. बंद बंगल्यातून चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, मंदिरातील फंडपेटीच गायब झाली आहे. तर मठातील फंडपेटी फोडून आतील रक्कम लंपास करण्यात आली आहे.

अणाव गावातील स्वयंभू रामेश्वर मंदिर व स्वामी समर्थ मठ हे रात्रीच्या वेळी कुलुप लावून बंद केले जातात. मंगळवारीही ते नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. बुधवारी सकाळी मंदिरात आलेल्या ग्रामस्थांना कुलूप तोडून पायरीवर टाकलेले दिसले. स्वामी समर्थ मठातील कुलूपही पायरीवर काढून फेकले असल्याचे समोरच घर असलेल्या समीर पालव यांच्या निदर्शनास आले.

दोन्ही देवस्थानांची कुलूपे तोडली

दोन्ही देवस्थानांची कुलूपे तोडली गेल्याने याबाबत चोरी झाल्याची तक्रार ओरोस पोलिसांत करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव, हवालदार परशुराम सावंत, नाईक विठ्ठल कोयंडे, शिपाई दत्तात्रय राऊत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

दोन्ही देवस्थानांतील मिळून 5 हजार चोरीस

पाहणी दरम्यान रामेश्वर मंदिरातील फंडपेटी गायब झाल्याचे दिसून आले.  मठातील फंडपेटी फोडून ती तेथेच बाजूला टाकलेली मिळाली. दरम्यान, दोन्ही देवस्थानातील मिळून सुमारे 5 हजार रुपये चोरीस गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हुमरमळा कळेवाडी येथील चंद्रकांत जनार्दन मर्गज यांचा बंद बंगलाही चोरटय़ांनी लक्ष्य केला. या बंगल्यातही कुलूप तोडूनच चोरटय़ांनी आत प्रवेश केला. आतील कपाटे व सामानही उस्कटले. मात्र, त्यांच्या हाती पैसे वा मौल्यवान अशी कोणतीच वस्तू लागली नसल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून ठसेतज्ञ डोईफोडे यांनी ठसेही टिपले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव करीत आहेत.