|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुर्द नेते बरहम सालिह इराकचे नवे राष्ट्रपती

कुर्द नेते बरहम सालिह इराकचे नवे राष्ट्रपती 

बगदाद

 कुर्द नेते बरहम सालिह यांना इराकचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहे. पेट्रिओटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान (पीयूके)चे उमेदवार सालिह यांनी कुर्दिस्तान डेमोक्रेटिक पार्टीचे (केडीपी) उमेदवार फुवाद हुसैन यांना पराभूत केले. देशाच्या खासदारांनी अन्य उमेदवारांना बाजूला सारून सालिह यांना मत दिले. सालिह यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

सालिह यांना 219 तर फुवाद यांना केवळ 22 मते मिळाली आहेत. बरहम यांना सर्वांचे समर्थन मिळाले असे देखील म्हटले जाऊ शकते. परंतु मतदानानंतर वाद झाल्याने मतमोजणी नव्याने करावी लागली. 58 वर्षीय सालिह हे इराकचे 8 वे राष्ट्रपती आहेत.

एखाद्या कुर्द नेत्याला इराकचा राष्ट्रपती म्हणून निवडणे तसे आश्चर्यकारक नाही. 2003 पासून इराकमध्ये राष्ट्रपती नेहमीच कुर्द व्यक्ती होत आला आहे. पंतप्रधान शिया मुस्लीम आणि संसदेचा सभापती सुन्नी व्यक्ती होतो. सुमारे 15 वर्षांपासून असेच चित्र दिसून येत आहे.
इराकचे अखंडत्व आणि सुरक्षेसाठी काम करणार असल्याचे सालिह यांनी म्हटले आहे. नव्या राष्ट्रपतींकडे संसदेतील सर्वात मोठय़ा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे लागणार आहे.