|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दिग्विजय बागलांवर प्राणघातक खुनी हल्ला

दिग्विजय बागलांवर प्राणघातक खुनी हल्ला 

संजय मस्कर/ करमाळा

बागल गटाचे नेते प्रिन्स उर्फ †िदग्विजय बागल यांच्यावर बुधवारी प्राणघातक जीवघेणा हल्ला झाला. मारहाणी दरम्यानच्या झटापटीवेळी पिस्तुलच्या ट्रीगरवरून बोट सरकल्याने मोठा अनर्थ टळून दिग्विजय बागल बालंबाल बचावले. मारेकऱयाकडून पिस्तुलचे ट्रीगर ओढले गेले असते तर बागल यांची या दरम्यान हत्या झाली असती. पण नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. तथापि जबरी मारहाणीमध्ये बागल हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. करमाळा बाजार समिती सभापती निवड आणि त्या अनुषंगाने बागल यांच्यावर झालेला खुनी हल्ला लक्षात घेता, करमाळ्यात गटातटांमधील वर्चस्वाचे राजकारण आता जीवावर उठले आहे. बाजार समितीवरील सत्तेसाठी संचालक फोडाफोडीचे राजकारण बागल गटाने केले खरे पण याने करमाळ्यात रक्तरंजित राजकारणाचा भयावह थरार झाला. 

करमाळा बाजार समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीची प्रक्रिया बुधवारी सकाळी बाजार समितीच्या कार्यालयात ठेवण्यात आली होती. या दरम्यान निवड प्रक्रिया पार पडताना हल्ल्याचा थरार झाला. बागल गटाला सत्ता स्थापन्यासाठी एक संचालक हवा होता. शिवाजी बंडगर यांना बागल गटाने फोडले. बंडगर हे जगताप आणि पाटील गटाकडून निवडून आले होते. मात्र सत्ता स्थापन करतेवेळी ऐनवेळी ते बागल गटाला जाऊन मिळाले त्यातून हा प्रकार झाला.

जगताप गटाने हल्ला केल्याचा दिग्विजय बागलांचा आरोप

बाजार समितीच्या निवडीचा कार्यक्रम सुरु असताना माजी आमदार जयंवतराव जगताप यांच्या मुलगा शंभूराजे जगताप  (दुसरा मुलगा नाव माहित नाही ) तसेच करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी कपडे फाडून पिस्तुल तसेच लोखंडी रॉडने नाकावर तसेच तोंडावर जबरी मारहाण केल्याचा आरोप दिग्विजय बागल यांनी मारहाणीनंतर केला आहे.

जगताप बंधूंच्या अटकेसाठी बागल समर्थकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

दिग्विजय बागल यांच्यावरील हल्याच्या प्रकरणात शंभूराजे तसेच वैभव जगताप यांच्यासह हल्यामधील अन्य दोषींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी बागल  गटाचे पाचशेहून अधिक समर्थक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते.

बागल यांच्यावर का झाला हल्ला ?

 करमाळा बाजार समितीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पर्यायाने सभापती बागल गटाचा होण्यासाठी या गटाला एका संचालकाची गरज होती तेव्हा बागल गटाने  माजी आमदार  जयवंतराव जगताप तसेच विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे झरे मतदार संघामधील उमेदवार प्रा. शिवाजी बंडगर यांना सभापतीपदाची ऑफर देवून फोडले. बागल गटाच्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जगताप व पाटील गटाची बाजार समितीवर सत्ता येण्याला ब्रेक लागला. हातातोंडाशी आलेला घास ओरबडला गेल्याची भावना जगताप गटाची झाली असावी. त्यातुनच जगताप गटाने बागल गटाचे प्रमुख दिग्विजय यांच्यावर हल्ला केल्याची चर्चा या तालुक्यात आहे.

जगताप बंधू नॉट रिचेबल

दिग्विजय बागल यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला शंभूराजे तसेच वैभव जगताप आणि त्यांच्या काही समर्थकांनी केल्याचा आरोप केला. या संदर्भात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जगताप बंधू यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे भ्रमणध्वनी संपर्कात नव्हते.

जगताप बंधूंसह 8 जणांवर अखेर गुन्हा दाखल

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी खुद्द दिग्विजय बागल यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव जगताप तसेच शंभूराजे जगताप यांच्यासह आठ जणांवर भारतीय दंडविधान कलम 307, 324, 504 या अन्वये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.

असा घडला घटनाक्रम

– सभापती निवडीसाठी अकरा वाजण्याच्या सुमारास बागल गट बाजार समितीत दाखल झाला

– त्यानंतर वैभव आणि शंभूराजे यांच्यासह आठजण बाजार समिती इमारतीच्या पाठीमागून आत आले

– सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया निवडणूक निर्णयाधिकारी यांनी घोषित केली

– सभापती पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्राध्यापक शिवाजीराव बंडगर यांना पुढे येण्याचा इशारा करण्यात आला

– याचवेळी बंडगरांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून परावृत्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्या

– जगताप आणि बागल गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी अन् झोंबाझोंबी सुरु झाली

– पुढच्याक्षणी बंडगर यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढे घेण्यात आले

– या प्रसंगी जगताप बंधू आणि त्यांचे समर्थक काही वेळ शांत झाले

– बाजार समिती पदाधिकारी निवडीच्या घोषणेनंतर जगताप बंधू आणि समर्थकांनी  पुढे होण्याचा प्रयत्न केला

– दिग्विजय बागल यांना घेराव घालून त्यांना मारझोड सुरु झाली

– या घटनेवेळी प्रचंड ताणतणाव झाला, त्यापूर्वी मोठी आरडाओरड झाली

– पोलीस बंदोबस्त असतानाही हल्ल्याचा प्रकार झाला

 – हल्ल्यानंतर मारेकरी पसार झाले

– दिग्विजय बागलांनी जखमी अवस्थेत प्रसार माध्यमांना माहिती दिली

– मारेकऱयांबद्दल नावे घेऊन आरोप केला

– दिग्विजय बागल उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे गेले

– बागल समर्थक मारेकऱयांना तत्काळ अटक करावी यासाठी करमाळा पोलीस ठाण्यात पोहोचले

– बागल समर्थकांचा दिवसभर पोलीस ठाण्यात ठिय्या

-रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हल्ल्याप्रकरणी जगताप बंधूंसह आठजणांवर गुन्हा दाखल

Related posts: