|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गांधीजींची जीवनशैली कायम प्रेरणादायीः राज्यपाल मृदूला सिन्हा

गांधीजींची जीवनशैली कायम प्रेरणादायीः राज्यपाल मृदूला सिन्हा 

प्रतिनिधी/ पणजी

भारतीय संस्कृती ही मानवतेवर आधारलेली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याचे प्रतिक आहेत. सत्याग्रह, स्वावलंबन, स्वच्छता, स्वानुभव यावर आधारीत गांधीजींची जीवनशैली कायम प्रेरणादायी आहे, अशा शब्दात राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित ‘भावांजली’ कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहूणे या नात्याने राज्यपाल मृदूला सिन्हा बोलत होत्या. राजभवन येथील दरबार हॉल येथे माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या रिजनल आऊटरीच ब्यूरो, पूणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये भजनातून महात्मा गांधी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी राज्यपाल मृदूला सिन्हां यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहली. यावेळी रिजनल आऊटरीच ब्युरो, पूणेचे संचालक संतोष अजमेरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या गीतांमध्ये भारतीय संस्कृतीच्या सर्व सूत्रांना गुंफण्यात आले होते. गांधीजीचे जीवनही असेच होते. असे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले. भारतीय संस्कृतीला खिंडार पडताना दिसले की काही लोक उभे राहतात आणि संस्कृतीचे पुनरुथ्थान करतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्याप्रमाणे पितृपक्षात पूर्वजांचे स्मारण केले जाते, त्याचप्रमाणे राष्ट्रपुरुषांचे स्मरण व्हावे, त्यांचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. गांधीजींचे कार्य, दृष्टीकोन यांचे स्मरण यानिमित्ताने व्हावे. साध्याला अनुसरुन साधन असले की लक्ष्य प्राप्ती निश्चित होते. ही शिकवण गांधीजींच्या आयुष्यातून आपल्याला मिळते असे देखील सिन्हा यांनी याप्रसंगी म्हणाल्या. स्वावलंबी कुटुंब, गाव यासाठी अंगभूत कौशल्याचा आधार घ्यावा. असे आवाहन मृदूला सिन्हा यांनी केले. गांधींच्या स्वप्नातील भारत उभा राहण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यानिमित्ताने पत्र सूचना कार्यालय, पणजीच्या महा निदेशक अर्मेलिंदा डायस व संतोष अजमेरा यांनी राज्यपालांना ‘गांधीजी इन चंपारण’ हे डी.जी तेंडूलकर लिखीत इंग्रजी पुस्तक भेट दिली.

या कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक मंत्री सुदिन ढवळीकर, राज्याचे मुख्य सचिव सचिव धर्मेंद्र शर्मा, गोवा विद्यापिठाचे उपकुलगुरु प्रा. वरुन साहनी, माजी केंद्रीय मंत्री रामकृपलानी सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्याहस्ते रिजनल आऊटरीच ब्युरो, पुणेच्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. अर्मेलिंदा डायस यांनी आभार मानले.

Related posts: