|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा ‘आनंद मेळावा’, 3500 ज्येष्ठांची उपस्थिती

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा ‘आनंद मेळावा’, 3500 ज्येष्ठांची उपस्थिती 

पुणे / प्रतिनिधी :

जनसेवा फाऊंडेशन-पुणेतर्फे ‘ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा मंचमध्ये सोमवारी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत हा मेळावा साजरा होणार असल्याची माहिती पुण्यात देण्यात आली. सुमारे 3500 ज्येष्ठांची या मेळाव्याला उपस्थिती असणार आहे.

गेल्या 16 वर्षांपासून हा आनंद मेळावा विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे आदी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रतापराव भोसले, स्वागताध्यक्षपदी वेकफिल्ड उद्योगसमुहाचे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, तर विशेष अतिथी म्हणून पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. के. एस. संचेती, रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य सचिव नितीन देसाई, डॉ. संजय चोरडिया, उद्योगपती ललित जैन आदी उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठांना सोशल मिडियाशी जोडण्यासाठी या मेळाव्यात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ‘जनसेवा फाऊंडेशन ज्येष्ठ नागरिक मंच’ची स्थापना करून पुणे जिह्यातील सुमारे 10 हजार ज्येष्ठांना एका क्लिकवर माहिती पुरविण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे.

या मेळाव्यात दानशूर नानजीभाई शहा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वयाची शंभरी ओलांडलेल्या 7 ज्येष्ठांना शतायुषी पुरस्कार, तर 80 वर्षांवरील 12 ज्येष्ठांचा सत्कार, तसेच नाटय़-सिनेसृष्टीतील व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध कार्यक्रम, ज्येष्ठांचे विविध गुणदर्शन, ज्येष्ठांना मान्यवरांचे प्रबोधन, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, अध्यात्मिक प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याला पुणे शहरातील अनिल शिरोळे, संजय काकडे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भिमराव तापकीर, विजय काळे, योगेश टिळेकर, जगदिश मुळीक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेता श्रीनाथ भिमाले आदी पाहुणेही उपस्थित राहणार आहेत.

Related posts: