|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीच्या शेतकऱयांची सोलापुरात मुस्कटदाबी

सांगलीच्या शेतकऱयांची सोलापुरात मुस्कटदाबी 

 

प्रतिनिधी/ सोलापूर

रत्नागिरी-नागपूर हायवेसाठी भरपाईची एक दमडीही न देता कोटय़वधींच्या जमिनी जबरदस्तीने सरकार हडप करीत आहे. याच धोरणाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी शेकडो मैल पायी चालत सांगलीकर शेतकरी सहकारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सोलापुरात दाखल झाले.

यावेळी सहकारमंत्र्यांनी भेट देणे अपेक्षित असताना पोलिसांकरवी या शेतकऱयांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार झाला. त्यामुळे शेतकरी संतापले, त्यांनी आपला मोर्चा थेट देशमुखांच्या घराकडे वळवला. शेतकऱयांचा जथ्था जसा देशमुखांच्या घराकडे आगेकूच करु लागला, तसा पोलिसांचा दंडुका चालू लागला. काहीकाळ पोलीस अन् शेतकऱयांमध्ये धुमश्चक्री झाली. पण, बहाद्दर शेतकरी मागे हटले नाहीत. पोलिसांचा लाठीचार्ज, झटापट, मारझोड सहन करीत अखेर सांगलीकर शेतकऱयांनी सहकारमंत्र्यांच्या घरावर धडक मारली अन् तळपत्या उन्हात ठिय्या मांडला. परगावी असलेल्या सहकारमंत्र्यांनी अखेर भ्रमणध्वनीवर आंदोलक शेतकऱयांशी संवाद साधत 24 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतरच सांगलीकरांनी आंदोलन स्थगित करत सोलापूर सोडले.

राज्य सरकारकडून रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी या मार्गावरील जमिनी अधिग्रहण करण्याचा धडाकाही सरकारने लावला आहे. परंतु, विनामोबदला जबरदस्तीने शेतकऱयांच्या जमिनी अधिग्रहण करण्याचे धोरण सरकार राबवित असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून सांगलीतील शेतकऱयांनी आंदोलन उभा केले होते.

याच आंदोलनाचा भाग म्हणून सांगली ते सोलापूर असा शेतकरी जथ्था सांगलीकर शेतकऱयांनी काढला. 4 ऑक्टोबर रोजी सांगली जिह्यातील अंकलीपासून या जथ्थ्यास प्रारंभ झाला. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी शेतकऱयांचा मोर्चा सोलापुरात दाखल झाला.

  रत्नागिरी-नागपूर हायवेसाठी राज्य सरकारने भरपाईची छदामही न देता सांगली आणि सोलापूर जिह्यांतील असंख्य शेतकऱयांकडून जबरदस्तीने त्यांची जमीन काढून घेतली आणि त्या जमिनीवर हायवेचे कामही सुरू केले. त्याविरुद्ध दोन्ही जिह्यांतील हजारो शेतकऱयांनी 4 ऑक्टोबरपासून सांगलीमधून आपला मोर्चा सुरू केला आणि 180 किलोमीटरचे अंतर कापत, विविध हायवेग्रस्त गावांत सभा घेऊन ते शनिवारी सकाळी सोलापुरात दाखल झाले.

 दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आपले निवेदन मंत्री सुभाष देशमुख यांना पाठविले होते आणि सोलापुरात त्यांच्याशी चर्चेची वेळ मागितली होती. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱयांनाही तशी विनंती केली होती. पण सुभाष देशमुख भेटीची वेळ न देता ते स्वतः तर पसार झाले. त्यामुळे आंदोलक शेतकरी संतापले. संतापलेल्या शेतकऱयांना आवरण्यासाठी पोलिसांना पुढे केले. पोलिसांकडून लाठीचार्ज करुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही केला, असा अरोप आंदोलक शेतकऱयांनी करीत ना. देशमुखांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

  पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता आंदोलक शेतकऱयांनी होटगी रोडवरील सहकारमंत्र्यांच्या घरासमोर रखरखत्या उन्हात ठिय्या मांडला. दरम्यान, आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, सहकारमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यावेळी मात्र पोलीसही धास्तावले. त्यांनी आंदोलकांना आवरण्यासाठी आश्रु धुराच्या नळकांडय़ाही फ्sढकण्याची तयारी केली होती.

  दरम्यान, सहकारमंत्री देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरुन आंदोलनाचे नेतृत्व करणारे डॉ. अजित नवले यांच्याशी संपर्क साधला आणि 24 ऑक्टोबर रोजी प्रश्नाशी संबंधित असलेले मंत्री, अधिकारी यांच्या समवेत आंदोलक शेतकऱयांच्या प्रतिनिधींशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आक्रमक आंदोलक शांत झाले अन् मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेत सांगलीला परतले.

  या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख, सीटूचे राज्य सरचिटणीस एम. एच. शेख, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष सिद्धप्पा कलशेट्टी, राज्य सहसचिव माणिक अवघडे, राज्य कौन्सिल सदस्य दिगंबर कांबळे, डॉ. सुदर्शन घेरडे आणि नामदेवराव करगणे, अनिल वासम इत्यादी करत आहेत. 

सहकारमंत्र्यांचा आंदोलकांकडून धिक्कार.

अखिल भारतीय किसान सभा भाजप सरकारच्या पोलिसांनी शेतकऱयांवर केलेल्या या अमानुष लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध करत आहे. तसेच कोणतीही भरपाई न देता शेतकऱयांची जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या राज्य सरकारच्या निर्लज्ज कारस्थानाचा तीव्र धिक्कार करत आहे. तसेच 24 ऑक्टोबरच्या मंत्रालयातील बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

Related posts: