|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » मर्यादित षटकांच्या मालिकेतून ख्रिस गेलची माघार

मर्यादित षटकांच्या मालिकेतून ख्रिस गेलची माघार 

भारताविरुद्ध वनडे, टी-20 मालिकेसाठी विंडीज संघाची घोषणा

वृत्तसंस्था / सेंट जॉन्स (अँटिग्वा)

जागतिक स्तरावरील विस्फोटक व स्टार फलंदाजांमध्ये आघाडीवर राहिलेल्या ख्रिस गेलने भारताविरुद्ध होणाऱया आगामी वनडे व टी-20 मालिकेतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. उभय संघात सध्या कसोटी मालिका सुरु असून त्यानंतर 5 वनडे व 3 टी-20 सामने होणार आहेत. पुढील वर्षात होणारी 50 षटकांची विश्वचषक स्पर्धा व 2020 टी-20 विश्वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेवत विंडीज निवडकर्त्यांनी या मालिकेसाठी तीन नव्या चेहऱयांना संधी दिली आहे. भारत-विंडीज यांच्यातील पहिली वनडे दि. 21 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीत खेळवली जाईल.

‘भारत दौऱयातील मर्यादित षटकांच्या मालिकेत आम्ही आमचा स्टार फलंदाज ख्रिस गेलशिवाय खेळणार आहोत. बांगलादेशच्या पुढील दौऱयातही तो सहभागी होणार नाही. मात्र, मायदेशी होणारा इंग्लंडचा दौरा व 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी त्याने आपली उपलब्धता कळवली आहे’, असे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाचे निवड समिती अध्यक्ष कोर्टनी ब्राऊन यांनी पत्रकातून नमूद केले.

सलामीवीर चंदरपॉल हेमराज, अष्टपैलू फॅबियन ऍलेन व जलद गोलंदाज ओशेन थॉमस यांना आगामी वनडे विश्वचषक व 2020 टी-20 विश्वचषक नजरेसमोर ठेवत यावेळी संघात स्थान दिले गेले आहे. ‘विश्वचषकासाठी आम्ही तयारी सुरु केली असून युवा खेळाडूंना संधी देण्यामागे तोच दृष्टिकोन आहे’, असे ब्राऊन यांनी याप्रसंगी म्हटले.

‘2020 आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला दोन वर्षांचा कालावधी असताना आणि वनडे विश्वचषक वर्षभरापेक्षाही कमी कालावधीत होत असताना आम्ही मागील काही कालावधीत विंडीज अ व ब संघातील खेळाडूंवर लक्ष ठेवून होतो. 2018 कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी कशी होते, त्याचेही विश्लेषण केले गेले. त्यानंतर तीन नव्या खेळाडूंना आम्ही संधी दिली. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी सहायक प्रशिक्षण पथक व अन्य संबंधित घटकांना देखील पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे. असा वेळ लाभला तरच ते खेळाडूंचे कौशल्य अधिक विकसित कसे करता येईल आणि उत्तम संघबांधणी कशी करता येईल, यावर लक्ष पुरवू शकतात’, याचाही ब्राऊन यांनी पुढे उल्लेख केला.

‘मागील काही कालावधीत ज्या अनुभवी खेळाडूंची कामगिरी अपेक्षेनुरुप झाली, त्यांचे स्थान अबाधित राहिले आहे. आता नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची त्यांची जबाबदारी असेल. या निवडीच्या निमित्ताने आम्ही संघात पदार्पण करणाऱया युवा खेळाडूंचे अभिनंदन करतो आणि पुनरागमनवीर डॅरेन ब्रेव्हो व केरॉन पोलार्ड यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वागतही करतो’, असे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

विंडीज क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह यांनी टी-20 संघ लवकर जाहीर करण्यामागील कारणे येथे विशद केली. ते म्हणाले, ‘गुवाहाटीत खेळवल्या जाणाऱया पहिल्या वनडे लढतीपूर्वी संघाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे फ्लाईट तिकीटे, व्हिसाची तजवीज करण्यासाठी सुपर 50 चषक सुरु होण्यापूर्वी संघनिवड जाहीर करणे आवश्यक होते. कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धा गत महिन्यातच संपन्न झाली असल्याने टी-20 संघाची निवड लांबणीवर टाकण्याचे काही कारणच नव्हते’

रसेलचा वनडेत समावेश नाही

दुसरीकडे, टी-20 संघात विस्फोटक फलंदाज केरॉन पोलार्ड, मध्यफळीतील फलंदाज डॅरेन ब्रेव्हो व अष्टपैलू आंद्रे रसेल यांचे पुनरागमन झाले. अर्थात, यापैकी आंद्रे रसेलला वनडे मालिकेत मात्र दुखापतीमुळे खेळता येणार नाही, हे स्पष्ट आहे. याशिवाय, भारताकडे रवाना होण्यापूर्वी अल्झारी जोसेफलाही तंदुरुस्ती चाचणी पार करावी लागणार आहे.

अपेक्षेप्रमाणे, डेव्हॉन ब्रेव्हो व फिरकीपटू सुनील नरेन यांना दोन्हीपैकी एकाही संघात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी, भारतीय व्हिसासाठी 25 सदस्यीय संघात या उभयतांचा उल्लेख नव्हता, त्याचवेळी त्यांना वगळले जाणार, याचे संकेत मिळाले होते. भारताविरुद्ध होणाऱया या मर्यादित षटकांच्या मालिकेत वनडे संघाचे नेतृत्व जेसॉन होल्डरकडे तर टी-20 संघाचे नेतृत्व कार्लोस ब्रेथवेटकडे असणार आहे.

वनडे संघ : जेसॉन होल्डर (कर्णधार), फॅबियन ऍलेन, सुनील ऍम्ब्रिस, देवेंद्रा बिशू, चंदरपॉल हेमराज, शिमरॉन हेतमेर, शाय होप, अल्झारी जोसेफ, इव्हिन लुईस, ऍश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमर रॉश, मॅरलॉन सॅम्युएल्स, ओशेन थॉमस.

टी-20 संघ : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), फॅबियन ऍलेन, डॅरेन ब्रेव्हो, शिमरॉन हेतमेर, इव्हिन लुईस, ओबेड मॅकॉय, ऍश्ले नर्स, किमो पॉल, खॅरी पिएरे, केरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, दिनेश रामदिन, आंद्रे रसेल, शेरफेन रुदरफोर्ड, ओशेन थॉमस.

मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेची रुपरेषा

तारीख / लढत / ठिकाण / लढतीची वेळ

21 ऑक्टोबर / पहिली वनडे / गुवाहाटी / दुपारी 2 पासून

24 ऑक्टोबर / दुसरी वनडे / विशाखापट्टणम / दुपारी 2 पासून

27 ऑक्टोबर / तिसरी वनडे / पुणे / दुपारी 2 पासून

29 ऑक्टोबर / चौथी वनडे / मुंबई / दुपारी 2 पासून

1 नोव्हेंबर / पाचवी वनडे / तिरुअनंतपूरम / दुपारी 2 पासून

4 नोव्हेंबर / पहिली टी-20 / कोलकाता / सायं. 7 पासून

6 नोव्हेंबर / दुसरी टी-20 / लखनौ / सायं. 7 पासून

11 नोव्हेंबर / तिसरी टी-20 / चेन्नई / सायं. 7 पासून.

 

Related posts: