|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » त्रिपुरारी पौर्णिमा आयोजन समितीची बैठक संपन्न

त्रिपुरारी पौर्णिमा आयोजन समितीची बैठक संपन्न 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यस्तरीय त्रिपुरा पौर्णिमा उत्सव समितीची बैठक कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सचिवालयात घेण्यात आली. यावेळी राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा आयोजनाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. सांखळी मुख्य रस्त्याची डागडुजी करणे व नौकायन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी घ्यावयाच्या उपाय योजनासंबंधी सविस्तर चर्चा झाली. वाळवंटीच्या पात्राची आवश्यक डागडुजी करण्यासंबंधी बैठकीत विशेष चर्चा झाली.

विठ्ठलापूर येथील वाळवंटीच्या पात्रात होणाऱया राज्यस्तरीय उत्सवाला अधिकाधिक लोकांना कसे आणता येईल याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना कला व संस्कृतीमंत्री गावडे यांनी आयोजकांना केली. बैठकीला कला व संस्कृती खात्याचे सचिव दौलत हवालदार, विठ्ठलापूर दीपावली समितीचे अध्यक्ष शैलेश फातर्फेकर, सांखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रविजय पंडित, कारापूर सर्वण पंचायतीचे सरपंच संतोष गुरव, डिचोलीचे जिल्हाधिकारी, वाहतूक खात्याचे पोलीस अधिकारी निमंत्रक सागर जावडेकर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे श्याम गांवकर व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची पुढील कृती ठरविण्यासाठी शुक्रवार 19 ऑक्टोबर रोजी सांखळी येथील रवींद्र भवनात दुसऱया बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

भरघोस बक्षिसे, रक्कमेत वाढ

या वर्षापासून नौकानयन स्पर्धेच्या बक्षिसांमध्ये भरीव वाढ करुन देण्याचा निर्णय कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी या बैठकीत जाहीर केला. त्यानुसार यावर्षी प्रथम पारितोषिक रु. 25 हजारच्या ऐवजी रु. 35 हजार राहील. पुढील चार बक्षिसांमध्ये प्रत्येकी रु. 10 हजारांची वाढ केली आहे.