|Friday, November 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » हल्ल्यांसाठी अल्पेश ठाकोर कारणीभूत?

हल्ल्यांसाठी अल्पेश ठाकोर कारणीभूत? 

उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे हात  : हजारोंचे पलायन : काँग्रेस नेत्याने आरोप फेटाळले 

ठाकोर सेनेचा सदस्य तसेच पक्षाच्या नेत्याला अटक

  वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांच्या विरोधात द्वेष फैलावल्याचा आरोप झाल्यावर काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे आपण कोणालाही धमकी दिली असेल तर स्वतःच तुरुंगात जाईन, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगत 11 ऑक्टोबरपासून सद्भावना उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. द्वेष पसरविणारी एक चित्रफित प्रसारित झाल्याने अल्पेश ठाकोर वादात सापडले असून काँग्रेस पक्षाचीही गोची झाली आहे. 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कारानंतर गुजरातमधून उत्तर भारतीय कामगारांना पलायन करण्यास भाग पाडले जात असून त्यांच्यावर अल्पेश यांची ठाकोर सेना हल्ले करत आहेत.

राज्य सरकार लोकांची सुरक्षा करण्यास अपयशी ठरत असल्याने आपल्याला बदनाम केले जातेय. अशाप्रकारचे राजकारण झाल्यास मी राजीनामा देईन. गुजरातमध्ये केवळ एकाच ठिकाणी हिंसाचार झाला असून त्याची मी निंदा करतो. गुजरात सर्वांसाठी असल्याचे विधान अल्पेश यांनी स्वतःच्या बचावाकरता केले
आहे.

काँग्रेस अडचणीत

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ले आणि पलायनासाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांची चिथावणी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. उत्तर भारत विशेषकरून उत्तरप्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांच्या विरोधात अल्पेश यांनीच मोर्चा उघडला होता. अल्पेश हेच काँग्रेस पक्षाचे बिहार प्रभारी आहेत हे विशेष. स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अल्पेश यांची व्यूहनीती त्यांच्यावर उलटली असून काँग्रेसला यामुळे फटका बसणार असल्याचे बोलले जातेय.

प्रक्षोभक भाषणाची चित्रफित

गुजरात पोलिसांनी काँग्रेसचे नेते महोत ठाकोर यांना अटक केली असून ते ठाकोर सेनेचे सदस्य देखील आहेत. महोत आणि अन्य 4 जणांना धमकीपूर्ण चित्रफित प्रसारित झाल्यावर अटक करण्यात आली आहे. या चित्रफितीत उत्तरप्रदेश, बिहारच्या लोकांना गाव सोडण्याची धमकी देण्यात आल्याचे दिसून येते.

उत्तर भारतीयांवर हल्ले

साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या मुलीवर बिहारच्या एका कामगाराने बलात्कार केल्यानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले केले जात आहेत. उत्तरप्रदेश आणि बिहार येथून उपजीविकेसाठी गुजरात येथे आलेल्या सुमारे 50,000 जणांनी पलायन केल्याचा दावा होतोय. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत एकूण 51 गुन्हे नोंद झाले असून 431 जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधातील हिंसाचाराच्या प्रकरणांमुळे राज्यातील एकूण 6 जिल्हे प्रभावित झाले आहेत.

 

Related posts: