|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रामपाल प्रकरणी आज निर्णय

रामपाल प्रकरणी आज निर्णय 

रोहतक

 हरियाणाच्या बरवाला येथील सतलोक आश्रम प्रकरणात रामपालबद्दल गुरुवारी दिल्या जाणाऱया निर्णयापूर्वी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हिसार जिल्हय़ात जमावबंदी लागू करण्यात आली असून सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. न्यायालय परिसरात कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी असणार आहे.

सुनावणीदिवशी हिसार शहरातील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली असून सुनावणीच्या 48 तासांपूर्वीच जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सुनावणीदरम्यान रामपालचे 10 ते 20 हजार समर्थक न्यायालय परिसर, मध्यवर्ती तुरुंग, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणांवर एकत्रित होऊ शकतात असा संशय प्रशासनाला आहे. या समर्थकांमुळे कायदा-सुव्यवस्था अडचणीत येऊ नये याकरता खबरदारीचे पावले उचलण्यात आली आहेत. शहरात एकूण 2000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हरियाणा पोलीस विभागाचे 12 पोलीस अधीक्षक आणि अन्य जिल्हय़ातील अधिकाऱयांना देखील हिसारमध्ये तैनात करण्यात आले असून निमलष्करी दलाच्या 5 तुकडय़ा तसेच शीघ्र कृती दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे.  सतलोक आश्रमाप्रकरणी 11 रोजी निर्णय दिला जाणार आहे. बरवाला येथील सतलोक आश्रमातील हत्यांच्या दोन खटल्यांची सुनावणी सुरू आहे.

राज्याच्या सीमेवर सतर्कता

प्रशासनाने प्रकरणाचे गांभीर्य पाहता शीघ्र कृती दलाला पाचारण केले आहे. राज्य सरकारने हिसारमध्ये 5 तुकडय़ा तैनात केल्याची माहिती दिली आहे. पोलीस प्रशासनाने शहराच्या सीमेवरील प्रत्येक केंद्रावर 24 कर्मचारी तैनात केले असून ते 15 ऑक्टोबरपर्यंत तेथेच असणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रामपालचे समर्थक हिंसक होण्याची शक्यता फेटाळता येत नसल्याने प्रशासनाने आवश्यक पावले उचलली आहेत.