|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जनावरांच्या पाण्यासाठी वडगाव ग्रामस्थांचा रास्ता रोको

जनावरांच्या पाण्यासाठी वडगाव ग्रामस्थांचा रास्ता रोको 

  ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : प्रशासनाला ग्रामस्थांचा गर्भित इशारा

प्रतिनिधी/ दहिवडी

वडगाव (ता. माण) येथील ग्रामस्थांनी जनावरांच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव देऊनही महिना झाला तरी टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी जनावरांसह दहिवडी-फलटण रस्त्यावर वडगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले.

ग्रामस्थांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, जनावरांच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव देऊन एक महिना उलटूनही त्यावर कोणतीच दखल घेतली गेली नाही. या प्रश्नाकडे प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत होते. प्रशासन ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहत होते. या निषेधार्थ ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनही दिले होते. मात्र, याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले गेले, त्यामुळे आज ग्रामस्थांनी जनावरांसह दहिवडी-फलटण रस्त्यावर आंदोलन केले. अजिनाथ जाधव यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून जिल्हाधिकाऱयांकडे वडगाव ग्रामस्थांच्या पाण्याचा विषय मांडला, त्यावेळी जिल्हाधिकाऱयांनी दोन दिवसात टँकर सुरू केला जाईल, असे सांगितले होते. मात्र, लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.

यावेळी नायब तहसीलदार सरवदे यांनी लेखी पत्र दिल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.